
१५ ऑगस्टपासून चिपी–नवी मुंबई विमानसेवा; कोकणवासीयांसाठी मोठा दिलासा
कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठी थेट विमानसेवा १५ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या नव्या सेवेमुळे मुंबई–कोकण प्रवासासाठी लागणारा ७ ते ८ तासांचा रस्तेप्रवास टाळून अवघ्या एका तासात प्रवास करता येणार आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, फ्लाय ९१ ही विमान कंपनी १५ ऑगस्टपासून चिपी–नवी मुंबई मार्गावर उड्डाणे सुरू करणार आहे. तसेच, त्यानंतर लवकरच इंडिगोची विमानसेवाही या मार्गावर उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही सेवा सुरू होत असल्याने कोकणात ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांसह पर्यटकांनाही मोठा लाभ होणार आहे. प्रवासाचा वेळ कमी होऊन अधिक जलद आणि सोयीस्कर वाहतूक उपलब्ध होणार असल्याने या निर्णयाचे स्वागत होत आहे.
सध्या चिपी विमानतळावरून पुणे, हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरांसाठी नियमित विमानसेवा सुरू असून, आता नवी मुंबईचा समावेश झाल्याने कोकणाच्या हवाई संपर्कात आणखी भर पडणार आहे.




