
युद्धाने हिरावला पुण्याचा तरुण! होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात हेरंब करमरकर यांचा करुण अंत
इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाची झळ भारतालाही बसत आहे. युद्धामुळे इंधनाच्या दरात वाढ झाली होती. आता या संघर्षात भारतीय नागरिकांच्याही जीविताला धोका निर्माण झाला असून, महाराष्ट्रातील पुण्यातील एका तरुण अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.मुलाच्या निधनाने करमरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पुण्याचे हेरंब करमरकर हे मर्चंट नेव्हीमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होते. ते एम.व्ही. जीएफएस गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर काम करत होते. रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हे जहाज ओमानच्या सागरी हद्दीतील होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना त्यावर हवाई हल्ला झाला. या हल्ल्यानंतर जहाजाच्या इंजिन रूमजवळ भीषण आग लागली. त्यावेळी हेरंब इंजिन रूममध्ये असल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कुटुंबासोबत रविवारी मध्यरात्री २.५० वाजता शेवटचा संवाद
जहाजावरील एकूण २४ कर्मचाऱ्यांपैकी २३ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र, हेरंब यांना वाचवता आले नाही. हल्ल्याच्या काही तासांपूर्वी, रविवारी मध्यरात्री २.५० वाजता त्यांनी पुण्यातील कुटुंबीयांशी शेवटचा संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी आपण सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केल्याचे कळवले होते. या संवादात आपण लवकरच भारतात परतणार असल्याचे त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर मंगळवारी त्यांच्या कंपनीने नातेवाईक रविंद्र टंडन यांना फोन करून हेरंब यांच्या निधनाची माहिती दिली. ही बातमी समजताच करमरकर कुटुंबावर मोठा आघात झाला असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे




