
स्ट्रक्चरल ऑडिटनंतर आंबेत पुलावरील वाहतुकीचा निर्णय होणार, बांधकाम विभागाचे स्पष्टीकरण
दोन बार्जेच्या धडकेनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांच्यावतीने क्षतिग्रस्त म्हाप्रळ आंबेत पुलाची तपासणी करण्यात आली. विपरित हवामान व पाण्याचा विरुद्ध प्रवाह यामुळे पुलाला बार्जेसने धडक दिलेल्या खांबाची केवळ वरून पाहणी करण्यात आली. यामध्ये खांबांना काही प्रमाणात धोका झाल्याचे निदर्शनास आल्याने स्ट्रक्चरल ऑडीट अहवालानंतरच वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले.
महाड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता ओंकार शिरगांवकर यांच्या माहितीनुसार पुलाच्या खांबाना हजार टनाहून अधिक वजनाच्या डेझरनी धडक दिल्याने खांब काही प्रमाणात क्षतिग्रस्त झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. तसा अहवाल संबंधित यंत्रणांना पाठवून पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक तातडीने बंद करण्यात यावी अशा सूचना सर्व दिलेल्या असल्याचे शिरगांवकर यांनी स्पष्ट केले आहे.




