रत्नागिरीत ३० खाटांचे एकात्मिक आयुष रुग्णालय उभारणार; १०.५० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

रत्नागिरी जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला मोठी चालना देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असून जिल्ह्यासाठी ३० खाटांच्या एकात्मिक आयुष रुग्णालयाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी १०.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

हे रुग्णालय रत्नागिरी शहरातील उद्यमनगर परिसरात, महिला रुग्णालयालगत उपलब्ध जागेत उभारले जाणार आहे. या प्रकल्पासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

नवीन रुग्णालय सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांना आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी अशा विविध आयुष उपचारपद्धतींसह आधुनिक वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. मध्यवर्ती ठिकाणी रुग्णालय उभारले जाणार असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांनाही या सेवांचा लाभ घेणे अधिक सोयीचे होणार आहे.

या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आयुष आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत होईल, तसेच स्थानिक पातळीवर दर्जेदार आणि सर्वसमावेशक उपचार सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button