
राजन साळवींबाबत प्रमोद जठारांचे वक्तव्य; कोकणात राजकीय चर्चांना उधाण
____
राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांच्याबाबत भाजपाचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे कोकणातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. साळवी यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत जठार यांनी भविष्यात ते पुन्हा आमदार किंवा खासदार म्हणून जनतेचे नेतृत्व करतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
प्रमोद जठार आणि राजन साळवी हे एकाच काळात विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलेले सहकारी आहेत. आपल्या पोस्टमध्ये जठार यांनी साळवी यांच्या सलग तीन कार्यकाळातील जनसंपर्क, लोकांशी असलेली नाळ आणि प्रत्येक सुख-दुःखात सहभागी होण्याच्या स्वभावाचा विशेष उल्लेख केला आहे. आज आमदार नसतानाही त्यांनी जनतेशी असलेला संपर्क कायम ठेवला असून, हाच त्यांच्या राजकीय प्रवासाचा मोठा आधार असल्याचे जठार यांनी म्हटले आहे.
या पोस्टमध्ये जठार यांनी, “राजन साळवी यांच्या सातत्यपूर्ण जनसंपर्कामुळे आणि लोकाभिमुख कार्यामुळे ते भविष्यात पुन्हा आमदार किंवा खासदार म्हणून नेतृत्व करतील,” असा विश्वास व्यक्त केला आहे. या विधानामुळे विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
राजन साळवी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्याकडे धाराशिव जिल्ह्याची संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली असून, ते सध्या त्या कामात सक्रिय आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत त्यांची कोकणातील उपस्थिती तुलनेने कमी दिसून आली आहे.
दरम्यान, ९ जुलै रोजी राजन साळवी यांचा वाढदिवस असून, त्याआधीच प्रमोद जठार यांनी शुभेच्छांसह केलेल्या या पोस्टमुळे कोकणातील राजकीय घडामोडींविषयी नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, या पोस्टमागे कोणताही राजकीय संकेत आहे की केवळ मैत्रीपोटी व्यक्त केलेल्या शुभेच्छा आहेत, याबाबत संबंधित नेत्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.




