
धावत्या एसटीचा मागील भाग कोसळला; देखभालीच्या निष्काळजीपणावर पुन्हा प्रश्नचिन्ह.!
गडचिरोली : एटापल्ली शहरात सोमवारी संध्याकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या बसबाबत घडलेल्या धक्कादायक प्रकाराने एसटीच्या देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रवाशांनी भरलेल्या धावत्या बसचा मागील भाग अचानक निखळून रस्त्यावर कोसळला. सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने आणि मागे कोणतेही वाहन अथवा नागरिक नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
बसचा मागील भाग अचानक कोसळला
गडचिरोलीहून मुलचेरा-बोलेपल्ली मार्गे एटापल्लीकडे येणारी मानव विकास मिशनअंतर्गत धावणारी अहेरी आगाराची बस सोमवारी सायंकाळी शहरात दाखल झाली होती. बसस्थानकाकडे जात असताना गोटूलसमोरील मुख्य रस्त्यावर बसच्या मागील भागाचा पत्रा आणि संरचनेचा काही भाग अचानक तुटून रस्त्यावर पडला. मोठा आवाज झाल्याने चालकाने तत्काळ बस थांबवली. त्यानंतर बसमधील सुमारे ३० प्रवासी घाबरून खाली उतरले.
पाहणी केली असता बसचा मागील भाग पूर्णपणे निखळल्याचे दिसून आले. घटना घडली त्यावेळी बस कमी वेगात असल्याने आणि तिच्या मागे कोणतेही वाहन अथवा पादचारी नसल्याने संभाव्य अनर्थ टळला. मात्र, हीच घटना राष्ट्रीय महामार्गावर किंवा भरधाव वेगात घडली असती, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकले असते, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
देखभाल व्यवस्थेवर नागरिकांचा संताप
घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली. बसच्या जीर्ण अवस्थेबाबत संताप व्यक्त करत त्यांनी परिवहन महामंडळाच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. बसच्या मागील भागावरील पत्रा जुना व कमकुवत झाल्याचे तसेच तो तात्पुरत्या स्वरूपात जोडल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
प्राथमिक चौकशीनंतर कारवाई
घटनेची माहिती मिळताच राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागीय कार्यालयाने चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक तपासणीत देखभाल आणि दुरुस्तीतील हलगर्जीपणा समोर आल्याने अहेरी आगारातील संबंधित सहायक कारागिरावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सलग घटनांमुळे सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात एसटीच्या देखभालीबाबत प्रश्न निर्माण होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी गडचिरोली-घोट मार्गावरील बसच्या छतामधून पावसाचे पाणी गळाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला होता. त्याआधी अहेरी आगाराच्या एका धावत्या बसचे छत उडाल्याची घटनाही घडली होती. या सलग घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेपेक्षा जीर्ण बस रस्त्यावर उतरवल्या जात असल्याची टीका पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.




