
दरडप्रवण भागातील ग्रामस्थांना स्थलांतरित करा ; ग्रामस्थांनीही प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी, दि. ७ )- दरडप्रवण भागातील ग्रामस्थांना प्रशासनाने स्थलांतरित करावे. स्थानिक लोकप्रतिनिधींची देखील त्यासाठी मदत घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज दिले.
शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री डाॕ सामंत यांनी बैठक घेतली. जिल्ह्यातील अतिवृष्टी व आपत्कालीन परिस्थितीचा सविस्तर आढावा या बैठकीत त्यांनी घेतला. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, अपर पोलीस अधिक्षक बी.बी. महामुनी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, दहिवलीसारखी दुर्घटना जिल्ह्यात होणार नाही, याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी. दरडप्रवण भागातील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करा. त्यासाठी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक अशा स्थानिक लोकप्रतिनिंधीची देखील मदत घ्यावी. ग्रामस्थांनीही प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देवून संभाव्य धोक्यांपासून सुरक्षित स्थळी जावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विजेच्या खांबांची प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घ्यावा. धोकादायक स्थितीतील, गंजलेले खांब त्वरित बदलावेत. वीज पुरवठा सुरळीत राहील त्याचबरोबर खंडित असणाऱ्या गावांमध्ये पूर्ववत करण्यासाठी युध्दपातळीवर नियोजन ठेवावे. आरोग्य यंत्रणेने आपल्या रुग्णवाहिका आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज असल्याची खात्री करावी. क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणा कायमच सतर्क असायला पाहिजे. अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांनी अशा दुर्घटनांमधून मनुष्यहानी होणार नाही, यासाठी विशेष खबरदारी घ्यावी.
जिल्ह्यातील धबधबे, धरणे या ठिकाणची पर्यटनस्थळे प्रशासनाने बंद करावीत. अशा ठिकाणी पोलीस यंत्रणेने विशेष बंदोबस्त ठेवावा, असेही पालकमंत्री म्हणाले.




