आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या ‘इंद्रधनुष्य’ कार्यक्रमात गर्भसंस्कार विषयावर विशेष संवाद


रत्नागिरी : गरोदरपणातील आईचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य, गर्भसंस्काराचे महत्त्व तसेच कुटुंबाच्या सकारात्मक सहकार्याची भूमिका या विषयांवर आधारित विशेष संवाद आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या ‘इंद्रधनुष्य’ या कार्यक्रमात बुधवार, ८ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता प्रसारित होणार आहे.
या कार्यक्रमात ज्येष्ठ आयुर्वेदिक वैद्या आणि गर्भसंस्कार अभ्यासक मंजिरी जोग यांच्याशी सोनाली सावंत यांनी संवाद साधला आहे. या संवादामध्ये गर्भसंस्कार म्हणजे काय, त्याचे गर्भवती माता आणि बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी होणारे फायदे, गर्भावस्थेदरम्यान आईला मिळणारे शारीरिक व मानसिक लाभ तसेच पती आणि कुटुंबीयांनी गर्भवती महिलेला कोणत्या प्रकारे भावनिक आणि कौटुंबिक आधार द्यावा, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
डॉ. मंजिरी जोग या रत्नागिरीतील ज्येष्ठ आयुर्वेदिक तज्ज्ञ असून गेली २५ वर्षांहून अधिक काळ त्या आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत आहेत. गर्भसंस्कार विषयाचा त्यांनी सखोल अभ्यास केला असून या विषयावर अनेकांना मार्गदर्शनही केले आहे. आपल्या स्वप्नातील बाळाच्या सर्वांगीण जडणघडणीसाठी गर्भसंस्कार हा एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. उत्तम बुद्धिमत्ता, नैतिक मूल्ये, भावनिक संतुलन आणि सकारात्मक सामाजिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी गर्भसंस्कार उपयुक्त ठरतो याबद्दल मार्गदर्शन त्यांनी या संवादातून केले आहे.
या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे आहेत. श्रोत्यांनी हा माहितीपूर्ण कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरीच्या ११४३ किलोहर्ट्झ मध्यमलहरी, १०१.५ मेगाहर्ट्झ एफ.एम. वाहिनी, न्यूजऑनएअर लाईव्ह मोबाईल अॅप तसेच यूट्यूबवरील ‘airratnagiri1248’ या माध्यमांतून ऐकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button