दहिवली दुर्घटना: बेपत्ता सतीश शेलार व शांताराम शेलार यांचे मृतदेह सापडले; एनडीआरएफची शोध मोहीम पूर्ण


*रत्नागिरी, दि. ७ : खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडी येथे भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या दोन्ही व्यक्तींचे मृतदेह शोधण्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पथकाला आज यश आले. सतीश शांताराम शेलार (वय ३०) आणि शांताराम बलराम शेलार (वय ८४) अशी मृतकांची नावे असून, त्यांचे मृतदेह आज सायंकाळी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
​दहिवली-शेलारवाडी येथे अचानक काल रात्री झालेल्या भूस्खलनामुळे शेलार कुटुंबियांचे घर ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. यामध्ये कल्पना शांताराम शेलार (वय ७३) यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
​मात्र, ढिगाऱ्याखाली बेपत्ता असलेल्या सतीश शेलार आणि शांताराम शेलार यांच्या शोधासाठी एनडीआरएफचे पथक मध्यरात्रीच चिपळूणहून शेलारवाडीकडे रवाना झाले होते. रात्रीचा अंधार पाऊस यामुळे शोध आणि बचाव कार्यात एनडीआरएफच्या जवानांना अडथळे निर्माण होत होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ढिगाऱ्याखाली त्यांनी ही शोध मोहीम राबवली. अखेर या मोहिमेदरम्यान दोन्ही बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. आवश्यक त्या प्रशासकीय व वैद्यकीय सोपस्कारांनंतर हे मृतदेह शोकाकुल नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
​घटनास्थळी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button