
धावत्या मांडवी एक्स्प्रेसमधून महिलेला ढकलून देणरा आरोपी अटकेत
धावत्या मांडवी एक्स्प्रेसमधून महिलेला ढकलून देत तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत येथील पोलिसांनी सचिन सत्यवान जुवळे (२९ रो. कोतवली) याला शनिवारी रात्री अटक केली. जखमी अद्वैत अतिश दिवेकर या दीड वर्षाच्या चिमुरड्याला उपचारानंतर त्याच्या आजी-आजोबांच्या स्वाधीन करण्यात आले.
याबाबत सुभाष बाबू तांबे (५९ आंजनी- बौद्धवाडी) यांनी येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी शुभ्रा अक्रिश दिवेकर, नातू अद्वैत व सचिन जुवळे हे तिघेजण मांडवी एक्सप्रेसमधून चिपळूण ते मुंबई असा प्रवास करत होते. मांडवी एक्स्प्रेस आंजनी- मेटे दरम्यान आली असता संशयिताने मुलगी शुभ्रासह तिच्या दीड वर्षाच्या – मुलाला धावत्या रेल्वेतून ढकलून दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
यात शुभ्रा दिवेकर हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. दीड वर्षीय चिमुरड्याच्या चेहर्यासह पायाला किरकोळ दुखापती झाल्या. या प्रकारानंतर संशयिताने रेल्वेतून उडी मारली. महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयिताला येथील पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी शैल्य सणस करत आहेत.




