लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त २३ जुलै २०२६ रोजी रत्नागिरी येथे “लोकमान्य टिळक” या नाट्यप्रयोगाचे आयोजन

राष्ट्रकवी रामधारी सिंह ‘दिनकर’ स्मृती न्यासाच्या वतीने आयोजन


रत्नागिरी : लोकमान्य टिळक यांना आधुनिक भारताचे शिल्पकार मानले जाते. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा त्यांचा घोष आजही प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानामुळे भारतीय जनमानसात राष्ट्रभक्तीची भावना जागृत झाली. त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंतीसारख्या सार्वजनिक उत्सवांद्वारे समाजजागृती केली.

टिळक हे केवळ स्वातंत्र्यसैनिक नव्हते, तर निर्भीड पत्रकार आणि महान विचारवंतही होते. इंग्रजांविरोधात परखड लिखाण केल्यामुळे त्यांना अनेकदा कारावास भोगावा लागला. तुरुंगवासात त्यांनी ‘श्रीमद्भगवद्गीता रहस्य अथवा कर्मयोगशास्त्र’ हा ऐतिहासिक ग्रंथ लिहिला, जो आजही प्रेरणादायी मानला जातो. राष्ट्रकवी रामधारी सिंह ‘दिनकर’ स्मृती न्यास लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, मुन्शी प्रेमचंद आणि राष्ट्रकवी दिनकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी कार्यरत आहे.

रत्नागिरीसाठी अभिमानाची गोष्ट- पालकमंत्री डॉ. उदय सामंत
या वेळी न्यासाचे अध्यक्ष नीरज कुमार यांनी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन उपक्रमाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, लोकमान्य टिळकांच्या जन्मभूमीत होणारा हा नाट्यप्रयोग रत्नागिरीसाठी अभिमानाची बाब असून ते स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यांनी रत्नागिरीकरांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शक मुजीब खान यांनी सांगितले की, रत्नागिरीमध्ये प्रथमच लोकमान्य टिळक यांच्या जीवन आणि विचारांवर आधारित नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. या माध्यमातून युवकांना स्वराज्याचा इतिहास आणि टिळकांचे कार्य समजून घेण्याची संधी मिळेल.

खासदार नारायण राणे यांचे प्रतिनिधी, स्वीय सहाय्यक योगेशजी मगदूम यांनी या उपक्रमाचे स्वागत करत, “स्वराज्य पर्व” यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, या नाट्यप्रयोगामुळे तरुण पिढीत स्वराज्याविषयीची जाणीव अधिक दृढ होईल.

दिल्लीहून आलेल्या प्रतिनिधींमध्ये राष्ट्रकवी रामधारी सिंह ‘दिनकर’ स्मृती न्यासाचे अध्यक्ष नीरज कुमार, विश्वभारती शांतिनिकेतनचे हिंदी विभागप्रमुख प्रा. सुभाषचंद्र राय, दिग्दर्शक मुजीब खान तसेच लोकमान्य टिळकांची भूमिका साकारणारे तेजस पारिख यांनी टिळक जन्मभूमीला भेट दिली.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त २३ जुलै २०२६ रोजी रत्नागिरी येथे “लोकमान्य टिळक” या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे लोकमान्य टिळक यांच्या पत्नीची भूमिका रत्नागिरीची युवा लोकगायिका राधिका भिडे साकारणार असल्याचे नीरज कुमार यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button