
मासे बंदी असल्याने पर्यटन हंगामात सुक्या मासळीची कोट्यवधींची उलाढाल
रत्नागिरी जिल्ह्यात सुट्ट्यांचा पर्यटन हंगाम संपला असून, समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळे आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळांना भेट देणारे पर्यटक परत जाताना कोकणची अस्सल चव आपल्या घरी घेऊन गेले आहेत. यंदा पर्यटकांनी सुक्या मासळीच्या खरेदीला मोठी पसंती दिल्याने सुक्या मासळीच्या बाजारपेठेत चांगलीच उलाढाल झाली. दिवसाला लाखो रुपयांची विक्री झाली असून, हंगामात ही उलाढाल कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे विक्रेते सांगतात.
पर्यटनस्थळी फिरल्यानंतर आठवण म्हणून स्थानिक खास वस्तू खरेदी करण्याकडे पर्यटकांचा कल असतो. कोकणात आंबा, काजू, फणस यांच्यासह आता सुक्या मासळीनेही पर्यटकांच्या पसंतीत विशेष स्थान मिळवले आहे. त्यामुळे रत्नागिरी, गुहागर, दापोली, चिपळूण, खेड, संगमेश्वर तसेच विविध समुद्रकिनार्यांलगतच्या बाजारपेठांमध्ये सुक्या मासळीच्या दुकानांवर दिवसभर ग्राहकांची गर्दी दिसून येत होती.
वाकट्या, बोंबील, कोळंबीचे सोडे, सुकट, जवळा अशा विविध प्रकारच्या सुक्या मासळीची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. बंदर परिसरात वाळत घातलेल्या ताज्या आणि दर्जेदार सुक्या मासळीला पर्यटकांकडून विशेष मागणी होती. सुकी मासळी अनेक दिवस टिकत असल्यामुळे परतीच्या प्रवासात जास्तीत जास्त साठा करून नेण्याकडे पर्यटकांचा कल होता. विशेषतः महिला पर्यटक या खरेदीत अधिक उत्साहाने सहभागी होताना दिसल्या.www.konkantoday.com




