जागृत नागरिक, मजबूत लोकशाही! मतदार याद्यांचा ‘विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६


लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात प्रत्येक नागरिकाचे मत मोलाचे असते आणि त्यासाठी मतदार यादीत आपले नाव अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. हीच अचूकता आणि पारदर्शकता आणण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने राज्यात ‘मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम २०२६’ घोषित केला आहे. या महत्त्वपूर्ण मोहिमेची प्रत्यक्ष सुरुवात ३० जून २०२६ पासून होत आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत या संदर्भातील सविस्तर वेळापत्रक आणि नियमांची माहिती दिली आहे. सर्व नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन देखील केले आहे.
​या विशेष मोहिमेत पारदर्शकता आणि अचूकतेसाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाचे टप्पे निश्चित केले आहेत. त्यानुसार २० जून २०२६ ते २९ जून २०२६ या कालावधीत तयारी, प्रशिक्षण व छपाईची कामे केली जातील. त्यानंतर ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६ या काळात बीएलओ (BLO) मार्फत घरोघरी जाऊन भेटी दिल्या जातील आणि २९ जुलै २०२६ रोजी मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण केले जाईल. नागरिकांना पाहण्यासाठी ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. यानंतर ५ ऑगस्ट २०२६ ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना आपले दावे व हरकती दाखल करता येतील. या प्राप्त झालेल्या दावे व हरकतींवर ५ ऑगस्ट २०२६ ते ३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत निकाल काढला जाईल आणि अखेर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. या संपूर्ण कार्यक्रमासाठी १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक (Eligibility Date) म्हणून निश्चित करण्यात आला आहे.
​या मोहिमेदरम्यान मतदारांनी सर्वप्रथम voters.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतःचे व आपल्या नातेवाईकांचे नाव तपासून घ्यावे आणि घोषणापत्रात आवश्यक तपशील भरावा. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी मतदार आपल्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी (BLO) संपर्क साधू शकतात. जर मतदार यादीतील तपशील उपलब्ध नसेल किंवा डेटाबेसशी जुळत नसेल, तर मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून संबंधित मतदारास नोटीस पाठवली जाईल.
​अशी नोटीस प्राप्त झाल्यास मतदारांनी स्वतःची जन्मतारीख व जन्मस्थळ (तसेच आवश्यकतेनुसार माता-पित्यांचे) सिद्ध करण्यासाठी काही विशिष्ट स्व-प्रमाणित कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने केंद्र किंवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) यांचे ओळखपत्र किंवा निवृत्तीवेतन आदेश (PPO), सक्षम प्राधिकरणाने दिलेले जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, मान्यताप्राप्त मंडळ किंवा विद्यापीठाचे शैक्षणिक प्रमाणपत्र, कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र, वनहक्क प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, किंवा शासनाने दिलेले जमीन अथवा घर वाटप प्रमाणपत्र यांपैकी कोणताही एक पुरावा सादर करता येईल. १ जुलै १९८७ पूर्वी, १ जुलै १९८७ ते २ डिसेंबर २००४ दरम्यान आणि २ डिसेंबर २००४ नंतर भारतात जन्म झालेल्या नागरिकांसाठी, तसेच भारताबाहेर जन्म झालेल्या व्यक्तींसाठी नियमांनुसार स्वतःचे किंवा पालकांचे वैध पुरावे सादर करावे लागतील. तसेच आधार पडताळणीकरिता निवडणूक आयोगाच्या ९ सप्टेंबर २०२५ च्या मार्गदर्शक निर्देशांचे पालन केले जाईल.
​काही अडचण असल्यास किंवा अधिक माहितीसाठी नागरिक आपल्या मतदारसंघाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. २६३-दापोली विधानसभा मतदारसंघासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी (०२३५८-२८२०३१ / ८८०६६९२३८३), २६४-गुहागर मतदारसंघासाठी खेडचे उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील (०२३५२-२६४८४८ / ९०११२३४२९९), २६५-चिपळूण मतदारसंघासाठी उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे (०२३५५-२५५०४६ / ९७३०४४४५४०), २६६-रत्नागिरी मतदारसंघासाठी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई (०२३५२-२२२४२२ / ७४२३९९९९९९) आणि २६७-राजापूर विधानसभा मतदारसंघासाठी उपविभागीय अधिकारी विश्वजीत गाताडे (०२३५३-२३२५१९ / ७७७६८१७९१६) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल. लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या आणि पवित्र प्रक्रियेत आपले नाव मतदार यादीत अचूक नोंदवले जावे, यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या मोहिमेत जागरूक राहून सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
-प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button