
ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एस टी महामंडळाची लालपरी सध्या आजारी
सर्वसामान्यांची आणि ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एस्टी महामंडळाची लालपरी सध्या स्वतःच आजारी पडली आहे. कधी काळी सुरक्षित प्रवासाची हमी देणार्या एसटी बसेसची अवस्था आता अत्यंत दयनीय, तुटकी आणि मोडकी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या वातानुकूलित आणि आरामदायी शिवशाही बसेसचे मोठे कौतुक केले गेले, त्या शिवशाही बसेस सुद्धा आज भंगार अवस्थेत रस्त्यांवर धावताना दिसत आहेत. दुरुस्तीच्या नावाखाली केवळ प्लास्टिक पट्टयांचे कपे म्हणजेच ठिगळे मारून प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा संताप प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
सध्या एस्टी महामंडळाच्या ताफ्यातील बहुतांश गाड्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. अनेक बसेसच्या खिडक्यांच्या काचा निखळल्या आहेत, तर काही गाड्यांना दरवाजेच नीट नाहीत. पावसाळ्यात किंवा रात्रीच्यावेळी प्रवास करताना प्रवाशांना वार्या-पावसाचा थेट सामना करावा लागत आहे.www.konkantoday.com




