‘डिजिटल अटक’चा बनाव करून १.२३ कोटींची फसवणूक प्रकरणी; दिल्ली-नोएडातून मुख्य सूत्रधार अटकेत


रत्नागिरीतील एका नागरिकाला पोलीस, सीबीआय आणि केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवून ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीचा रत्नागिरी सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गगनदीप भारद्वाज याला दिल्ली-नोएडा परिसरातून अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

फिर्यादी मकरंद जोशी यांना आरोपींनी फोन करून त्यांच्या नावावर बनावट बँक खाते उघडण्यात आल्याचा दावा केला. या खात्याचा वापर मानव तस्करी आणि मनी लॉन्डरिंगसारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी झाल्याचे सांगत त्यांना भीती दाखवण्यात आली. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना ‘डिजिटल अटक’ करण्यात आल्याचे भासवून सतत व्हिडिओ कॉलद्वारे देखरेखीखाली ठेवण्यात आले.

कथित चौकशी व खात्याच्या पडताळणीच्या नावाखाली आरोपींनी जोशी यांच्याकडून विविध बँक खात्यांमध्ये एकूण १ कोटी २३ लाख रुपये जमा करून घेतले. तांत्रिक तपासादरम्यान ही रक्कम एका चॅरिटेबल ट्रस्टच्या खात्यात वळवण्यात आल्याचे उघड झाले.

तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली. आरोपींनी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना सीएसआर निधीतून मोठे देणगी मिळवून देण्याचे आमिष दाखवत उत्तर प्रदेशात बोलावले. त्यानंतर त्यांना ओलीस ठेवून बँक खात्यांची माहिती आणि धनादेश बळजबरीने मिळवले. या माध्यमातून तब्बल १ कोटी ४ लाख रुपयांचा अपहार करण्यात आला.

बँक व्यवहारांचा मागोवा, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे रत्नागिरी सायबर पोलिसांनी गगनदीप भारद्वाजचा ठावठिकाणा शोधून नोएडा येथे सापळा रचला आणि त्याला अटक केली. या प्रकरणात यापूर्वी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी स्मिता सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार जाधव, पोलीस हवालदार संदीप नाईक आणि पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कदम यांच्या पथकाने केली.

नागरिकांनी सावध राहावे : पोलीस अधीक्षकांचे आवाहन

पोलीस, सीबीआय किंवा अन्य केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे सांगून कोणी सिमकार्ड, बँक खाते किंवा आर्थिक व्यवहारांबाबत धमकी देत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये. कोणत्याही परिस्थितीत बँक खात्याच्या पडताळणीसाठी पैसे पाठवू नयेत किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे.

सायबर फसवणुकीच्या कोणत्याही प्रकाराची तक्रार तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात, रत्नागिरी सायबर पोलिसांकडे (8830404650) किंवा राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन 1930 वर करावी, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button