
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख महामार्गाच्या दुतर्फा रंगीबेरंगी फुलझाडांची लागवड
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख महामार्गाच्या दुतर्फा रंगीबेरंगी फुलझाडांची लागवड करून हरित आणि आकर्षक पर्यटन मार्ग विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत या वृक्षारोपण मोहिमेचा आढावा घेत संबंधित अधिकार्यांना आवश्यक निर्देश दिले.
देवगड-निपाणी (६२ कि.मी.) आणि विजयदुर्ग-कासार्डे (५० कि.मी.) या महामार्गांच्या दुतर्फा एकूण ११२ किलोमीटर अंतरावर हरित पट्टा विकसित केला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्राचे राज्यपुष्प ’ताम्हण’, ’एशियन चेरी’, गुलमोहर, कांचन यांसारख्या फुलझाडांसह आकाश शेवगा, जांभूळ, साग आणि शिसम यांसारख्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
प्रवासादरम्यान पर्यटकांना निसर्गसौंदर्याचा वेगळा अनुभव मिळावा आणि जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. बैठकीत त्यांनी केवळ औपचारिक वृक्षारोपण न करता झाडांचे दीर्घकालीन संवर्धन आणि संगोपन यावर भर देण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक हवामान आणि कोकणच्या भौगोलिक परिस्थितीशी सुसंगत प्रजातींची निवड करून त्यांचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थापन आराखडा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
www.konkantoday.com




