
बांबूने मारहाण करणाऱ्या चौघांना सहा महिन्यांचा तुरुंगवास
राजापूर : विहिरीवर म्हशी धुण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून बांबूने मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी राजापूर न्यायालयाने चार आरोपींना सहा महिन्यांची साधी कैद व एकूण दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
आत्माराम लक्ष्मण शिंदे, शांताराम लक्ष्मण शिंदे, अनिल आत्माराम शिंदे आणि अजित आत्माराम शिंदे (सर्व रा. हरळ-वारेवाडी, ता. राजापूर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. राजापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. हाके यांनी हा निकाल दिला.
प्रकरणानुसार, आरोपी हरळ-वारेवाडी येथील विहिरीवर म्हशी धुत असताना फिर्यादी प्रतीक प्रभाकर शिंदे यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित करून त्यांना म्हशी धुण्यास विरोध केला. याचा राग आल्याने आत्माराम व अनिल शिंदे यांनी प्रतीक शिंदे यांना बांबूने डोक्यावर, डाव्या हातावर व बोटांवर मारहाण करून दुखापत केली.
तसेच अजित शिंदे यांनी फिर्यादीची बहीण हेमांगी प्रभाकर शिंदे यांना मारहाण करून धक्काबुक्की व शिवीगाळ केली, तर शांताराम शिंदे यांनी फिर्यादीचे वडील प्रभाकर सीताराम शिंदे यांना बांबूने मारहाण करून शिवीगाळ व धक्काबुक्की केली. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र चव्हाण यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी वकील ओंकार गांगण यांनी नऊ साक्षीदार तपासले, तर सहाय्यक सरकारी वकील भालचंद्र सुपेकर यांनी अंतिम युक्तिवाद केला. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून प्रथमेश उकार्डे व सचिन बळीप यांनी काम पाहिले.
या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय प्रमाणपत्रे तसेच रासायनिक विश्लेषण अहवालातील पुरावे विश्वासार्ह असल्याचे न्यायालयाने नमूद केले. फिर्यादीच्या कपड्यांवरील व जप्त बांबूवरील रक्ताचे नमुने आणि इतर पुराव्यांवरून आरोपींनी मारहाण करून दुखापत केल्याचे निःसंशयपणे सिद्ध झाल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने दोषी आरोपींना शिक्षा सुनावली.




