भरधाव डंपरची रिक्षाला धडक; एक ठार, रिक्षाचालक गंभीर जखमी


खेड तालुक्यातील भरणे-खेड मार्गावर शनिवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात भरधाव डंपरने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिलारे आयणी येथील संतोष भिलारे हे त्यांच्या ताब्यातील रिक्षा (एमएच ०८ एक्यू ८७८४) घेऊन भरणेहून खेडकडे जात होते. आठवडा बाजार परिसरात रिक्षा पोहोचताच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की रिक्षेचा मागील भाग अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात संतोष भिलारे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मात्र मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून तो रिक्षेतील प्रवासी होता की रिक्षात बसण्यासाठी थांबलेला असताना अपघातात सापडला, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. १०८ रुग्णवाहिका सेवा तसेच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या.
दरम्यान, या अपघातामुळे भरणे-खेड मार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अपघाताचे नेमके कारण, मृत व्यक्तीची ओळख आणि डंपर चालकाची जबाबदारी याबाबत खेड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button