
लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधी आंदोलकांची पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी भेटआंदोलकांना मंत्रालयात बैठकीचे आश्वासन
खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी येथील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आज १२९ दिवस पूर्ण झाले. कंपनीत पीएफएएस (PFAS) रसायनांचे उत्पादन होत असल्याचा आरोप करत कंपनी बंद करण्याची मागणी कोकण नागरी संघर्ष समिती आणि स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली.
लोटे एमआयडीसी परिसरात खासगी दौऱ्यावर आलेल्या पंकजा मुंडे यांना आंदोलकांनी निवेदन देत कंपनीमुळे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत माहिती दिली. आंदोलकांचे म्हणणे ऐकल्यानंतर मंत्री मुंडे यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेण्याच्या सूचना दिल्या.
तसेच आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाची मंत्रालयात लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. मात्र कंपनी बंद करण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम असून जोपर्यंत कंपनी बंद होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या या आंदोलनाची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी आणि कंपनीच्या कार्यप्रणालीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या भेटीनंतर आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.




