
कशेडी बोगद्याच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी
मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडी बोगद्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ झाला आहे. घाटातील धोकादायक वळणांपासून सुटका झाल्याने वाहनचालकांसह प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता या बोगद्याच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी प्रवेश आणि निर्गमन मार्गांवर आकर्षक वारली पेंटिंग साकारण्यात येत आहे.
कशेडी बोगद्याच्या दोन्ही लेनच्या इन आणि आउट मार्गांवर काढण्यात येणारी वारली चित्रकला प्रवाशांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. या मार्गावरून प्रवास करणारे पर्यटक, वाहनचालक तसेच अनेक मान्यवर कुतूहलाने या चित्रांकडे पाहाताना दिसत आहेत. वारली पेंटिंग ही महाराष्ट्रातील आदिवासी वारली जमातीची पारंपरिक लोककला असून भारतातील प्राचीन लोककलांपैकी एक मानली जाते. मातीच्या लालसर किंवा तपकिरी पार्श्वभूमीवर पांढर्या रंगातून साकारली जाणारी ही कला साधेपणातून संस्कृतीचे दर्शन घडवते. या चित्रांमध्ये त्रिकोण, वर्तुळ आणि चौकोन अशा भूमितीय आकारांच्या माध्यमातून माणसं, प्राणी, झाडं, निसर्ग तसेच ग्रामीण जीवनाचे विविध पैलू साकारण्यात आले आहेत. वारली कला ही आदिवासी संस्कृतीचे प्रतीक मानली जात असून सजावटीसाठीही ती अत्यंत आकर्षक समजली जाते. कशेडी बोगद्याच्या प्रवेशद्वारावर साकारण्यात आलेल्या या वारली कलेमुळे महामार्गाच्या सौंदर्यात भर पडली असून कोकणातील सांस्कृतिक वारशाची अनोखी ओळख प्रवाशांना अनुभवायला मिळत आहे. कशेडी बोगद्यात प्रवाशांना बोर वाटू नये यासाठी ही वारली पेंटिंग काढण्याची संकल्पना पुढे आली. येथील स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुण निशांत बाघे यांने ही वारली पेंटिंग साकारली.www.konkantoday.com



