
अतिक्रमण, बेकायदेशीर पार्किंग आणि सिग्नलमुळे रत्नागिरीत वाहतूक कोंडी
रत्नागिरी शहरातील मुख्य ८० फूटी रस्ता दिवसेंदिवस अरुंद होत चालल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. बेकायदेशीर पार्किंग, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि नव्याने सुरू करण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
काही दिवसांपूर्वी जेलनाका येथे वाहतूक पोलिसांकडून सिग्नल सुरू करण्यात आला. मात्र, सिग्नल सुरू करण्यापूर्वी रस्ता पूर्णपणे मोकळा करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मारुती मंदिरकडून माळनाका ते एसटी स्टँड या मार्गावरील एका बाजूच्या पट्ट्याचे डांबरीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. परिणामी, ४० फूट रस्त्यापैकी केवळ सुमारे ३० फूट भागच वाहतुकीसाठी वापरता येत आहे.
जेलनाका येथील सिग्नलचा कालावधी केवळ २६ सेकंदांचा असल्याने वाहनांची गर्दी वाढत आहे. साईड पट्टी अपूर्ण असल्यामुळे वाहनांना बाजूला उतरणे शक्य होत नाही. त्यामुळे काही वाहने पुढे जाण्यापूर्वीच पुन्हा लाल सिग्नल लागत असून वाहतुकीचा खोळंबा होत आहे.
एसटी स्टँडकडून मारुती मंदिरकडे जाणाऱ्या मार्गावर आंबेडकर पुतळ्यापासून जेलनाक्यापर्यंत रस्त्याच्या कडेला रुग्णवाहिका आणि अन्य वाहने पार्क केली जात असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. अनेकदा वाहनांच्या रांगा आंबेडकर पुतळ्यापर्यंत पोहोचत असल्याचे चित्र दिसत आहे.
याशिवाय, माळनाका ते एसटी स्टँड दरम्यान उर्वरित १० फूट रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने त्या जागेवर टपरीधारकांनी अतिक्रमण केल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. जयस्तंभ ते रामनाका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरून एसटी स्टँडपर्यंत फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढल्याने रस्ता आणखी अरुंद झाला आहे.
दरम्यान, मारुती मंदिर येथील सिग्नलही सुरू करण्यात आल्याने शहरातील वाहतूक कोंडीत अधिक भर पडली आहे. वाढती वाहनसंख्या लक्षात घेता सिग्नल यंत्रणा राबवण्यापूर्वी रस्ते रुंद आणि अतिक्रमणमुक्त करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.




