
अवकाळी वादळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अडीच कोटींचे नुकसान
रत्नागिरी : या महिन्यात पडलेल्या अवकाळी वादळी पावसाने संपूर्ण जिल्ह्यात २ कोटी ४६ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान केल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. या पावसाने मंडणगड तालुक्यात एक कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान केले आहे. यापैकी बरेचसे नुकसान शनिवारी दुपारनंतर आलेल्या धुळीच्या वादळाने केलेल्या पडझडीमुळे झाले आहे.
जिल्ह्यात तापमानात आणि आर्द्रतेत अधिक वाढ होऊ लागली आहे. उन्हाने जीव कासावीस होत असतानाच घामाच्या धारा असह्य करत आहेत. त्यात अधूनमधून जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. मात्र, पावसाच्या हलक्या सरीमुळे उकाड्यात अधिकच वाढ होत आहे.
गेल्या तीन चार दिवसांपासून उकाड्यात कमालीची वाढ होत असतानाच हवामान खात्याने जिल्ह्यात ७ मेपासून पावसाच्या आगमनाचा अंदाज व्यक्त केला होता. ७ आणि ८ रोजी जिल्ह्यातील काही भागांत पावसाच्या हलक्या सरी तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडला. मात्र ९ मे रोजी दुपारनंतर अचानक धुळीचे वादळ जिल्हाभरात सुरू झाले. या वादळाने बहुतांश भागात पडझडीमुळे अतोनात नुकसान केले. धुळीच्या वावटळीबरोबरच वाऱ्याच्या झंझावाताने अनेक मोठमोठी झाडे रस्त्यावर कोलमडून पडली. काही घरांवर झाडे कोसळल्याने त्यांचे नुकसान झाले.
घरांची काैले, पत्रे उडाले. धुळीचे वादळाने कमी वेळेत प्रचंड नुकसान केले. या वादळामुळे विद्युत पोलवर झाडे कोसळल्याने पुरवठा विस्कळीत झाला. अनेक ठिकाणी विद्युत पोल मोडले. रोहित्र निकामी झाले. अचानक आलेल्या या धुळीच्या वादळाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्यांदाच धुळीचे वादळ आल्याचे ज्येष्ठांकडून सांगण्यात येत आहे.
सर्वाधिक नुकसान महावितरणचे १ कोटी १५ लाख रुपयांचे झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमाने तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत केला.




