रत्नागिरीत काजू-बी शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ

रत्नागिरी : जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बहुप्रतीक्षित ‘काजू-बी शेतमाल तारण योजने’चा नुकताच शुभारंभ करण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली ही योजना बाजार समितीचे सभापती संदीप सुर्वे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे अखेर मार्गी लागली असून, देवरुख येथील शेतकऱ्याला तारण कर्जाचा धनादेश सुपूर्द करून या योजनेला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.

मागील दोन वर्षे काजू-बी शेतमाल तारण योजनेसाठी शासनाकडून निधी उपलब्ध होत नव्हता. बाजार समितीने सातत्याने पाठपुरावा करूनही निधीअभावी ही महत्त्वपूर्ण योजना कार्यान्वित होऊ शकली नव्हती. परिणामी, काजू उत्पादक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित होते. मात्र, यंदा बाजार समितीचे सभापती संदीप सुर्वे यांनी फेब्रुवारी महिन्यापासूनच कृषी पणन मंडळ, पुणे यांच्याकडे निधीसाठी जोरदार पाठपुरावा सुरू केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, मे महिन्यात योजनेसाठीचा निधी बाजार समितीकडे जमा झाला.

निधी उपलब्ध होताच तातडीने कार्यवाही करत, शनिवार दिनांक ९ मे रोजी देवरुख (ता. संगमेश्वर) येथील शेतकरी दिनकर गणपती पाटील यांच्याकडील काजू-बी तारणात घेऊन त्यांना तारण कर्जाचा धनादेश प्रातिनिधिक स्वरूपात प्रदान करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक हेमचंद्र यशवंत माने, सचिव पांडुरंग जयराम कदम यांच्यासह बाजार समितीचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

दोन वर्षांच्या खंडानंतर सुरू झालेल्या या योजनेमुळे ऐन हंगामात काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. यापुढील काळात या काजू-बी तारण प्रक्रियेची व्याप्ती वाढवली जाणार असून, यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सामावून घेणार असल्याचे मत सभापती संदीप सुर्वे यांनी व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button