
कोकणातील आंबा, काजू बागायतदारांचा वर्षावर मोर्चा!
मुंबई : अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे नुकसान झालेले कोकणातील आंबा व काजू बागायदार १५ मे रोजी आपल्या विविध मागण्यांकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी मोर्चा काढणार आहेत. सायंकाळी ४ वाजता गिरगाव चौपाटी ते वर्षा निवासस्थान असा हा मोर्चा निघेल. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या न्याय्य मागण्या बागायदार त्यांच्यापर्यंत पोहोचविणार आहेत.
अवकाळी पावसामुळे व बदलत्या वातावरणामुळे कोकणातील बागायदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची नुकसानभरपाई मिळावी यासाठी बागायदारांच्या शिष्टमंडळाने शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. आपले झालेले नुकसान आणि मागण्या त्यांनी ठाकरे यांच्या कानावर घातल्या.
मोर्चात हजारो आंबा, काजू बागायदार उतरणार आहेत. मोर्चाची आखणी करण्याकरिता मुंबई, ठाणे, कल्याण येथील कोकणवासीयांची तातडीची बैठक १२ मे रोजी बाेलावण्यात आली आहे. सायंकाळी ६ वाजता शिवसेना भवन येथे ही बैठक होईल. यात शिवसेनेचे नेते विनायक राऊत, अनिल परब, सुनिल प्रभु, अरुण दुधवडकर, महेश सावंत, रमेश कोरगावकर हे मार्गदर्शन करतील. या बैठकीला कोकणवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाचे सचिव विनायक राऊत यांनी केले आहे.




