माझं कॉलेज जीवन….

सन १९७५ या वर्षी शासनाने त्या आधी अनेक वर्ष चालू असलेली ११ वी मॅट्रिक व त्यानंतर ४ वर्ष महाविद्यालयीन शिक्षण ही पद्धती बदलून नवीन १० + २ + ३ म्हणजेच १० वी मॅट्रिक त्यानंतर २ वर्ष ज्युनिअर कॉलेज व मग ३ वर्ष महाविद्यालयीन शिक्षण पद्धती लागू केली.

फाटक हायस्कूलच्या अकरावी कॉमर्स या वर्गातून आम्ही (त्या वेळेला संपूर्ण रत्नागिरी मध्ये बारावी शिक्षणासाठी एकमेव असलेल्या) गोगटे- जोगळेकर कॉलेजच्या ज्युनिअर कॉलेज मध्ये बारावी कॉमर्ससाठी प्रवेश घेतला. आम्ही कॉलेजला जायला लागलो. आमच्यासाठी स्वप्नवत असलेले “कॉलेज कुमार” हे स्टेट्स आम्हाला मिळाले. युनिफॉर्म शिवाय सिविल ड्रेस घालून कॉलेजला जाणे हे सुद्धा एक अप्रुपच होते. त्या वेळच्या फॅशन प्रमाणे बेल बॉटम पॅन्ट/शर्ट असा मुलांचा पेहराव होता. आमच्या वेळी मुलींसाठी जीन्स आणि टॉप हे अजून ही आले नव्हते. काही मुली तर परकर पोलक्या सारखा बाळबोध पेहराव करून येत असत. अनेक मुलांसारखे आम्ही सुद्धा आमच्या घरापासून चालतच कॉलेज मध्ये येत असू. मोटर सायकल किंवा स्कूटर हे तर सोडाच पण साधी सायकल घेऊन येणारे विद्यार्थी सुद्धा क्वचितच असत. सकाळी ७.३० ते ११.३० ही आमच्या कॉमर्स आणि आर्ट्स डिपार्टमेंटची वेळ असे. सायन्सचे विद्यार्थी दुपारी १२ वाजता येत असत. आत्ताच्या मेन गेट समोरच्या मुख्य इमारतीला एक लाकडी जिना होता. त्या जिन्यावरून वरती गेल्यावर उजवीकडे समोरच प्राचार्य यांची केबिन होती (दरवाजा सदैव उघडी असलेली) आणि डावीकडील खोली म्हणजे महाविद्यालयाचे कार्यालय होते. त्या ठिकाणी श्री. पेडणेकर, घवाळी, शिंदे, लोवलेकर असे क्लार्क काम करत असत. अनेक वर्षा नंतरही त्या लोकांशी माझा संपर्क राहिला. त्या काळी कॉलेज साठी फार शिपाई नव्हते. त्यापैकी आमचे मित्रत्वाचे संबंध होते ते कै. भिकु कांबळी यांच्याशी. ते एक उत्तम व्यायामपटू आणि बॉडी बिल्डर होते. सध्याच्या तळ मजल्यावरील असलेल्या प्राचार्य केबिनच्या जागी त्याकाळी कॉलेजचा जिमखाना होता. उजवीकडील छोटीशी खोली एन. एस. एस. साठी होती. आम्ही फाटक हायस्कूल मधून आलेले सर्व विद्यार्थी बारावी आर्ट्स, कॉमर्स व सायन्स या वर्गामधून विभागले गेलो. मी, बापू पाटणकर, अजित केळकर, उदय केळकर, समीर तेंडुलकर, भारत सावंत, अश्रफ व वाहाब मांगा अशी अनेक मित्र मंडळी प्रवेश करती झाले होते. रत्नागिरीतील कॉन्व्हेंट स्कूल, शिर्के हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल या मधूनही अनेक विद्यार्थी आले होते. तसेच नायरी संगमेश्वर व खेड जवळील उरूस या गावातून मधून बारावी शिक्षणासाठी आलेली विद्यार्थी विद्यार्थिनी कॉलेजच्या हॉस्टेल मध्ये राहत असत. त्या वेळचे आमचे कॉलेजचे वातावरण हे जात धर्मापडीकडील मित्रत्वाचे आणि खेळीमेळीचे होते.
आम्हाला सौ. सुजन शेंडे (मराठी), श्री . सहस्त्रबुद्ध्ये ज्यु. (इकनॉमिक्स), काळे सर (इंग्लिश). श्री सी. यु. हळबे आणि एच. एल. पटवर्धन सर (अकाऊंटन्सी) (सध्या दोन्हीही रत्नागिरीतील प्रख्यात चार्टर्ड अकाऊंटंट) हे आमचे प्राध्यापक होते. एच. एल. पटवर्धन सर यांचा क्रिकेट हा आवडीचा विषय होता. ते आम्हाला कॉलेज ग्राउंड वर संध्याकाळी क्रिकेट चे कोचिंग देत असत. कॉलेज ऑफिस मध्ये क्लार्क असलेले श्री. लोवलेकर सर हे त्यांच्या पोलिस हेडक्वार्टर समोर असलेल्या घरामध्ये अकाऊंटन्सीचे क्लास घेत असत. अकाऊंटन्सी हा विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगायची त्यांची हातोटी विलक्षण होती. विद्यार्थ्यांकडून कोणत्याही फीसाठी त्यांचा आग्रह नसायचा.
वार्षिक स्नेह संमेलनामध्ये विविध एकांकिका, ऑर्केस्ट्रासोबतच एक भन्नाट कार्यक्रम व्हायचा. “फिश पॉंन्डस” म्हणजेच कोपरखळ्या. स्टेजवरील निवेदकांनी विद्यार्थी विद्यार्थिनिना नावाने संबोधून केलेल्या कोट्या. उदाहरणार्थ “दुरून डोंगर साजरे”,“देव तारी त्याला कोण मारी, एकाच म्यानातल्या दोन तलवारी” असे मजेशीर टोमणे मारले जायचे. पण सर्वचजण ते खेळीमेळीने घ्यायचे. एक छोटेसे कॉलेज कँटिन होते ते ढोरे हे कुटुंब चालवत असत. जय सतंभावरील हॉटेल “सम्राट” व “प्रभाकर उपाहारगृह” हे आमची आवडते ठिकाणे होती. फारसे पैसे कुणाकडेच नसायचे पण ज्या दिवशी ज्याच्याकडे असत तो दिलदार. जेमतेम एक वर्षाचा हा कालखंड तो मनात कायम घर करून राहिला.

आज आमच्या ज्युनिअर कॉलेजला पन्नास वर्ष होत आहेत. त्या कालखंडामध्ये आपल्या ज्युनिअर कॉलेजने विविधांगी प्रगती केली आहे. १९९४ पासून आजतागायत अखंड पणे चालू असलेली “कल्पना एक आविष्कार अनेक” या मध्यवर्ती सुत्रानुसार “ शामराव करंडक एकांकिका स्पर्धा ” अखंड पणे चालू आहे. त्या मध्ये आजच्या रंगभूमी, दूरदर्शन, चित्रपट यासाठी अनेक कलाकार व तंत्रज्ञ दिलेले आहेत. २००१ साली प्राचर्य देव सरांच्या कालखंडामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स व आय. टी. या नवीन विषयांची विद्यार्थ्यांना उपलब्धता करून देण्यात आली. त्या मधून तयार झालेले अनेक तंत्रज्ञ नोकरी व्यवसायात कार्यरत आहेत. या पुढेही रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सचे ज्युनिअर कॉलेज म्हणजेच आत्ताचे अभ्यंकर कुळकर्णी ज्युनिअर कॉलेज हे आपल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे नव नवीन क्षितिज उघडेल व आपला विद्यार्थी हा देशासाठी उत्तम नागरिक बनवेल याचा विश्वास आहे. या सुवर्ण महोत्सवासाठी मनपूर्वक शुभेच्छा.

आपला
श्री. राजेंद्र श्यामकांत मलूष्टे,
नियामक मंडळ सदस्य, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी.
माजी विद्यार्थी १२ वी कॉमर्स
१९७७/७८ बॅच.
R. E. Society’s Junior College Of Arts, Science & Commerce, Ratnagiri.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button