जयगड बंदरातील ‘आमीर गॅस’ जहाज जप्त करण्याचे आदेश;


रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरात उभ्या असलेल्या ‘आमीर गॅस’ या जहाजावर मुंबई उच्च न्यायालयाने कडक कारवाई करत तात्काळ जप्तीचे आदेश दिल्याने सागरी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत ही निर्णायक पावले उचलली.

‘झंग युनियन इंटरनॅशनल’ या कंपनीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर या जहाजाच्या व्यवहारांवर संशय निर्माण झाला. तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. जहाजाच्या व्यवस्थापन कंपनीने दुबईमध्ये चुकीची माहिती सादर केली होती, तर जयगड बंदरात येण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला होता. याहून गंभीर बाब म्हणजे, या जहाजाचे दोन वेगवेगळे मालक असल्याचे उघड झाले असून त्यांच्यातील वादही या प्रकरणाला अधिक गुंतागुंतीचे बनवत आहे.

न्यायालयाने यासर्वांची गंभीर दखल घेत ‘आमीर गॅस’ जहाज तात्काळ जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जहाजावरील ‘एलपीजी (मिक्स) इन बल्क’ माल उतरवण्यास बंदी केली आहे. जेसएडब्ल्यू जयगड पोर्ट लि. ला ‘आऊटवर्ड पोर्ट क्लिअरन्स’ न देण्याचे निर्देश ही न्यायालयाने दिले आहेत. हे जहाज भारतीय सागरी हद्दीबाहेर जाऊ नये, यासाठी कडक देखरेख ठेवण्यात येणार आहे. तपासात आणखी एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे की, हे जहाज भाडेकरारावर घेतले गेले होते. त्यावरील गॅसचा साठा इराकमध्ये भरला गेला होता आणि तो पाकिस्तानात पोहोचवण्याचे नियोजन होते. मात्र, मध्येच जहाजाचा मास्टर बदलून आणि कागदपत्रांमध्ये फेरफार करून जहाज भारताकडे वळवण्यात आले.

स्थानिक शिपिंग एजंट मिलिंद बनप यांनी न्यायालयाच्या आदेशाची पुष्टी केली असून सध्या हे जहाज जयगड पोर्टच्या देखरेखीखाली कडक पोलीस व सागरी सुरक्षा यंत्रणांच्या निगराणीखाली आहे. या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे समोर येत असल्याने पुढील काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘आमीर गॅस’ प्रकरण आता केवळ स्थानिक न राहता जागतिक पातळीवर लक्ष वेधून घेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button