
धीरेंद्र शास्त्री विरुद्ध श्याम मानव वाद पेटला; चमत्कार सिद्ध करा आणि ८० लाख मिळवा, नागपुरातून प्रतिआव्हान!
Dhirendra Shastri vs Shyam Manav controversy and miracle challenge : मध्यप्रदेशच्या बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री हे नागपूरमध्ये रामकथेच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. त्यांच्या दौऱ्यात आधी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेले विधान वादग्रस्त ठरले.
त्यानंतर आता त्यांनी केलेला चमत्काराचा दावा वादाच्या भोवऱ्यात आहे. शंभर दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या एका मुलाला स्वतःच्या पायावर उभे केल्याचा दावा करण्यात आला होता. या दाव्यावर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी यावर आक्षेप घेतला असून चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हानच धीरेंद्र शास्त्री यांना दिले आहे. नेमके प्रकरण काय आहे? ते पाहू.
श्याम मानव यांनी कोणते आव्हान दिले?
टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना श्याम मानव म्हणाले की, धीरेंद्र शास्त्रींनी दुसऱ्यांदा आमच्या आव्हानातून पळ काढला आहे. त्यांच्या दिव्य दरबारा ऐवजी नागपूरच्या पत्रकारसंघासमोर चमत्काराचा प्रयोग करावा. ऐनवेळी धीरेंद्र शास्त्री यांच्यासमोर आम्ही १० माणसे उभी करू. या १० माणसांचे नाव, त्यांच्या वडिलांचे नाव, फोन नंबर धीरेंद्र शास्त्रींनी सांगायचा आहे. हे दावे त्यांनी दिव्य दरबारमध्ये आधीच केलेले आहेत.
धीरेंद्र शास्त्री यांच्या दुसऱ्या दाव्याबद्दल माहिती देताना श्याम मानव म्हणाले, “धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितल्याप्रमाणे ते कोणाच्याही घरात जाऊन काहीही पाहून येऊ शकतात. त्या पद्धतीने त्यांनी पत्रकार संघाच्या शेजारच्या खोलीत १० वस्तू ठेवल्या जातील, त्या त्यांनी ओळखून दाखवाव्यात. या दोन्ही प्रकारात जर धीरेंद्र शास्त्री यांनी ९० टक्के अचूक उत्तर दिल्यास त्यांनी दिव्यशक्तीचे आव्हान जिंकले आहे, असा त्याचा अर्थ होईल. मग आम्हीही मानू की त्यांच्या दिव्यशक्ती आहे.
श्याम मानव पुढे म्हणाले की, पण धीरेंद्र शास्त्री हे आव्हान स्वीकारत नसतील. पत्रकारांसमोर येणार नसतील तर ते दिव्यशक्तीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करतात, लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन स्वतःचा लाभ करतात, असा जाहीर आरोप आम्ही त्यांच्यावर करतो.
तर धीरेंद्र शास्त्री यांना ८० लाख रुपये देऊ
२०२३ मध्येही आपण धीरेंद्र शास्त्री यांना आव्हान दिले असल्याची आठवण श्याम मानव यांनी करून दिली. ते म्हणाले, १९ फेब्रुवारी २०२३ रोजी पोस्टाने पत्र पाठवून त्यांना आव्हान दिले होते. तेच आव्हान आम्ही त्यांना पुन्हा देत आहोत. त्यावेळी आव्हानाची रक्कम ३० लाख रुपये होती. आता ती वाढवून आम्ही ८० लाख रुपये करत आहोत.
मात्र ही आव्हाने त्यांना पत्रकार संघात येऊन पूर्ण करावी लागणार आहेत. त्यांचा दिव्य दरबार किंवा प्रवचनाच्या ठिकाणी होऊ शकणार नाहीत. तिथे त्यांच्या नियंत्रणातील परिस्थिती असते. त्यामुळे त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचण्याची शक्यता अधिक आहे. दिव्यशक्तीचा दावा असा सिद्ध करता येणार नाही. धीरेंद्र शास्त्री यांचे जितके वय आहे, त्यापेक्षा अधिक म्हणजेच ४४ वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करत आहे, असेही श्याम मानव यांनी सांगितले.
धीरेंद्र शास्त्रींचेही प्रतिआव्हान
दरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनीही श्याम मानव यांना प्रतिआव्हान दिले आहे. याबाबतचा त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते म्हणाले, “यावेळी मी मध्यप्रदेशात नाही तर नागपूरमध्ये आहे. एकूण पाच दिवस मी इथे थांबणार आहे. हे राज्य, शहर आणि व्यासपीठही तुमचेच आहे. त्यामुळे कुणाला काही ‘खुजली’ असेल त्यांनी आमच्या दरबारात यावे. माझ्याकडे जी विद्या, जी शक्ती आहे, ती दाखवून देऊ. मी काही जादूगार नाही. मला ईश्वर जी प्रेरणा देतो, त्याप्रमाणे लोकांना मार्गदर्शन देतो. जर ते (श्याम मानव) आले तर त्यांनाही मार्गदर्शन देऊ.”
खुजली शब्दावरून श्याम मानव यांची टीका
धीरेंद्र शास्त्री यांनी खुजली शब्द वापरून प्रतिआव्हान दिल्यानंतर श्याम मानव यांनीही कडाडून टीका केली. जो व्यक्ती स्वतःला बाबा असल्याचे सांगतो आणि खुजली सारखे शब्द वापरतो, यावरून त्यांची संस्कृती काय आहे, हे दिसून येते. धीरेंद्र शास्त्री हे कुणी बाबा नसून भोंदू आहेत, असा माझा थेट आरोप आहे, असेही श्याम मानव म्हणाले.
श्याम मानव कोण आहेत?
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव हे गेल्या चार दशकांहून अधिक काळ महाराष्ट्रात तर्कनिष्ठ विचारवंत म्हणून ओळखले जातात. बुवाबाजी, अंधश्रद्धा आणि जादूटोण्याविरोधात त्यांनी मोठे कार्य केले आहे. १९८० च्या दशकात त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम हाती घेतले. लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी त्यांनी गावोगावी जाऊन चमत्कार आणि त्यामागील हातचलाखी उघड करण्यासाठी शिबिरे घेतली.
महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा मंजूर व्हावा यासाठी त्यांनीही मोठा लढा दिला होता. याशिवाय श्याम मानव उत्तम वक्ते, व्याख्याते आणि लेखक आहेत. संमोहन, मानसतज्ज्ञ या विषयावरील त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.



