
शेंबवणे प्रीमियर लीग पर्व चौथे : गाव एकवटले, क्रिकेटचा जल्लोष रंगणार!
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात, मुंबई-गोवा महामार्गापासून अवघ्या २ ते ३ किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात वसलेले शेंबवणे गाव पुन्हा एकदा क्रिकेटच्या उत्साहाने दुमदुमणार आहे. ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने आणि गावातील गाव प्रमुख,वाडी प्रमुख,मानकरी,ग्रामस्थ,सरपंच, पोलीस पाटील,शेंबवणे प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि त्यांचे कार्यकारणी सहकारी तसेच मुंबई मंडळाच्या सहकार्याने भव्य “शेंबवणे प्रीमियर लीग पर्व चौथे” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धा शनिवार, दिनांक २ मे २०२६ आणि रविवार, दिनांक ३ मे २०२६ रोजी शेंबवणे येथील जुवळेवाडी मैदानावर रंगणार आहे. मागील तीन वर्षांप्रमाणे यंदाही ही स्पर्धा अधिक जोशात आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडणार असून, संपूर्ण गाव या आयोजनासाठी सज्ज झाले आहे.
ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नसून, गावातील तरुणांना एकत्र आणणारा आणि त्यांच्या कौशल्याला व्यासपीठ देणारा एक सामाजिक उपक्रम बनला आहे. गावातील विकासकामांना चालना देण्याचाही या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे, मैदानाची तयारी, विकेट बनवणे, व्यवस्थापन यापासून ते पाहुणचारापर्यंत सर्व कामे गावकरी स्वतः पुढाकार घेऊन करतात.
या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दोन दिवस संपूर्ण गाव आणि उपस्थित क्रीडाप्रेमींसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था केली जाते. एका दिवशी शाकाहारी तर दुसऱ्या दिवशी मांसाहारी भोजनाचा आस्वाद सर्वांना मिळणार आहे.
शेतकरी, व्यावसायिक, मिस्त्री, रिक्षा चालक अशा विविध क्षेत्रातील ग्रामस्थ आपापली दैनंदिन कामे बाजूला ठेवून ३ ते ४ दिवस या स्पर्धेसाठी तन-मन-धनाने योगदान देतात. याशिवाय अनेक दानशूर व्यक्तींकडून रोख रक्कम, चषक, औषधे तसेच अन्नधान्याच्या स्वरूपात मदत मिळत असल्याने स्पर्धेला भक्कम आधार मिळतो.
यंदाचे शेंबवणे प्रीमियर लीग पर्व चौथे हे अधिक भव्य आणि आकर्षक होणार असल्याने संगमेश्वर तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या गावांतील नागरिक आणि क्रीडाप्रेमींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
गावाच्या एकजुटीचे आणि क्रीडा संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या स्पर्धेला उपस्थित राहून तिची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक – शेंबवणे ग्रामस्थ आणि मुंबई मंडळ यांनी केले आहे.




