भर उन्हाळ्यात राज्यावर वीज संकट ! तीन वीज निर्मिती संच बंद!

नागपूर : राज्यात वाढत्या उकाड्यामुळे विजेची मागणी ३० हजार मेगावॅटच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. त्याचवेळी महानिर्मितीच्या कोराडी, चंद्रपूर आणि नाशिक येथील प्रत्येकी एक असे तीन वीज निर्मिती संच बंद पडले आहेत. त्यामुळे मागणी आणखी वाढल्यास वीज पुरवठ्यावर ताण येण्याची शक्यता असून, अखंडित वीज पुरवठा राखणे हे वीज यंत्रणेसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

विदर्भासह राज्यातील अनेक भागांत तापमानात मोठी वाढ झाली असून उकाड्याने नागरिक त्रस्त आहेत. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा, कुलर, पंखे आदी उपकरणांचा वापर वाढला आहे. याशिवाय कृषी पंपांच्या वाढत्या वापरामुळेही विजेची मागणी सातत्याने वाढत आहे. सोमवारी (२७ एप्रिल २०२६) दुपारी २.२० वाजता राज्यातील विजेची मागणी २९,५०३ मेगावॅट इतकी नोंदवली गेली, त्यात मुंबईतील सुमारे ४ हजार मेगावॅट मागणीचा समावेश होता. ही मागणी येत्या काळात आणखी वाढण्याचे संकेत आहे.

दरम्यान, कोराडी प्रकल्पातील संच क्रमांक ८, नाशिकमधील संच क्रमांक ४ आणि चंद्रपूरमधील संच क्रमांक ७ विविध कारणांमुळे बंद पडले आहेत. या संचांमधील वीज निर्मिती थांबल्याने राज्यात अचानक मागणी वाढल्यास पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वीज क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्ती केली जात आहे.

महानिर्मितीकडून ६,८४७ मेगावॅट वीजनिर्मिती

राज्यातील २९,५०३ मेगावॅट मागणीपैकी सुमारे १७,७५० मेगावॅट वीज निर्मिती होत होती. त्यापैकी महानिर्मितीकडून ६,८४७ मेगावॅट उत्पादन होत होते. यात औष्णिक प्रकल्पांतून ६,३११ मेगावॅट, उरण गॅस प्रकल्पातून २६८ मेगावॅट, कोयना जलविद्युत प्रकल्पातून १५६ मेगावॅट आणि सौर ऊर्जेतून ९७ मेगावॅट वीज निर्मितीचा समावेश आहे. खासगी प्रकल्पांत जिंदल (९४७), अदानी (२,५२८), आयडियल (२४४), रतन इंडिया (१,२९९), बुटीबोरी (२९१) आणि एसडब्ल्यूपीजीएल (३१९ मेगावॅट) यांचे योगदान होते. तसेच केंद्राच्या वाट्यातून राज्याला १२,०४२ मेगावॅट वीज उपलब्ध होत होती.

संच बंद पडण्यामागील कारणे

कोराडीतील ६६० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ८ आणि चंद्रपूरमधील ५०० मेगावॅटचा संच क्रमांक ७ हे बॉयलर ट्यूब गळतीमुळे बंद आहेत, तर नाशिकमधील २१० मेगावॅटचा संच क्रमांक ४ तांत्रिक बिघाडामुळे ठप्प आहे. कोराडी व नाशिक येथील दुरुस्ती मंगळवारपर्यंत, तर चंद्रपूर येथील दुरुस्ती बुधवारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती महानिर्मितीचे जनसंपर्क अधिकारी संतोष पुरोहित यांनी दिली. दरम्यान, मागणीच्या तुलनेत आवश्यक वीज उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले असून, वीजपुरवठा यंत्रणा विस्कळीत होण्याचा धोका नसल्याचा दावा महावितरणच्या जनसंपर्क विभागाने केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button