‘या’ नागरिकांना आता ITR पासून मुक्ती! ‘फॉर्म १२५’ भरा आणि टेन्शन फ्री व्हा; नव्या प्राप्तिकर कायद्यातील मोठा बदल!

Income Tax Return : दरवर्षी प्राप्तीकर परतावा भरायचा म्हणजे धावपळ सुरू होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी तर ही तारेवरची कसरत असते. मात्र, यापुढे हा त्रास कायमस्वरुपी संपणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राप्तिकर परतावा भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने ‘प्राप्तिकर कायदा २०२५’ अंतर्गत विशेष सवलत दिली आहे.

७५ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना, ज्यांचे उत्पन्न केवळ पेन्शन आणि व्याजावर अवलंबून आहे, त्यांना आता दरवर्षी ITR भरण्याच्या कटकटीतून मुक्तता मिळू शकते. यासाठी सरकारने ‘फॉर्म नंबर १२५’ हा नवीन पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

नेमकी काय आहे ही सवलत?

प्राप्तिकर कायद्याच्या कलम ३९३(१) नुसार, जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने ‘फॉर्म १२५’ आपल्या बँकेत जमा केला, तर त्यांना वैयक्तिकरित्या आयटीआर फाईल करण्याची गरज उरणार नाही. त्यांच्या उत्पन्नावर कराची गणना करणे आणि तो सरकारकडे जमा करणे ही सर्व जबाबदारी आता संबंधित बँक पार पाडेल. थोडक्यात, बँकच तुमच्या वतीने कराचे सर्व काम करेल.

जुना नियम विरुद्ध नवीन नियम.. काय बदल झाला?

वैशिष्ट्ये जुना नियम (Act 1961) नवीन नियम (Act 2025)
कलम कलम १९४P कलम ३९३(१)
फॉर्मचे नाव फॉर्म १२ बीबीए फॉर्म १२५
पात्रता वय ७५ वर्षे किंवा अधिक ७५ वर्षे किंवा अधिक
बँकेची भूमिका टॅक्स मोजणे आणि टीडीएस कापणे टॅक्स मोजणे आणि टीडीएस कापणे

या सवलतीसाठीच्या अटी

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • वय ७५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
  • व्यक्ती भारताची रहिवासी असणे अनिवार्य आहे.
  • तुमचे उत्पन्न केवळ पेन्शन आणि त्याच बँकेतून मिळणारे व्याज इतकेच मर्यादित असावे.
  • जर तुम्हाला भाडे, कमिशन, शेअर्समधील नफा किंवा व्यवसायातून उत्पन्न मिळत असेल, तर तुम्ही या सवलतीसाठी पात्र ठरणार नाही. अशा परिस्थितीत ITR भरणे बंधनकारक असेल.

फॉर्म कसा आणि कधी भरायचा?

  • ‘फॉर्म १२५’ हा दरवर्षी बँकेत जमा करणे आवश्यक आहे.
  • तुम्ही हा फॉर्म प्रत्यक्ष बँकेत जाऊन किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने देखील भरू शकता.
  • लक्षात ठेवा, ही टॅक्समधून सूट नाही, तर केवळ परतावा भरण्यापासून सूट आहे. बँक तुमच्या उत्पन्नावर टॅक्स मोजून तो कापून घेईल.

हा लेख केवळ शैक्षणिक उद्देशासाठी असून, यातील ‘फॉर्म १२५’ संबंधीची माहिती सरकारी नियमांनुसार बदलू शकते. ही सवलत केवळ पेन्शन आणि व्याज उत्पन्न असलेल्या पात्र ज्येष्ठांसाठी असून, इतर उत्पन्न असल्यास आयटीआर भरणे बंधनकारक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button