महाराष्ट्रासह देशभरात उष्णतेची लाट; हवामान विभागाकडून नागरिकांना कडक सूचना, कोणत्या गोष्टी टाळाव्या लागणार?


येत्या काही दिवसांत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान; तसेच मध्य भारतातील तुरळक भागांत उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

किनारपट्टी आणि पूर्वेकडील भागात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, उत्तर भारताच्या काही भागांत रात्रीही उकाडा जाणवू शकतो. ‘२७ एप्रिलपर्यंत वायव्य भारतातील कमाल तापमानात कोणताही लक्षणीय बदल होणार नाही. त्यानंतर तापमानात हळूहळू घट होईल; तर मध्य आणि इतर भागांत अंदाजाच्या कालावधीत तापमानात टप्प्याटप्प्याने वाढ आणि त्यानंतर घट होण्याची शक्यता आहे,’ असेही यांनी सांगितले.

महाराष्ट्रातही दिवसेंदिवस उष्णतेचे चटके तीव्र होत आहेत. खान्देशचा पारा गेल्या काही दिवसांपासून ४१ ते ४३ अंशांदरम्यान रेंगाळत आहे. जळगावचे तापमान ४३.४, नंदुरबार ४१; तर अहिल्यानगरचा पारा ४० अंशावर गेला. राज्यात शनिवारी उच्चांकी ४५.६ अंश सेल्सिअस तापमान अकोल्यात आणि सर्वांत कमी किमान तापमान २१.६ अंश सेल्सिअस महाबळेश्वरमध्ये नोंदविण्यात आले. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा ४० ते ४५ अंशांच्या पुढेच नोंदवला गेल्याने यंदा राज्यभरात उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे.

नाशिकमध्ये शनिवारी तापमानाचा पारा थेट ४१ अंशांवर गेला. शुक्रवारी कमाल तापमान ३९.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. त्यामध्ये चोवीस तासांत सुमारे दोन अंश सेल्सिअसची वाढ होऊन ते ४१.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले. या हंगामातील हे उच्चांकी तापमान ठरले आहे. मालेगावला ४३.४, जळगावला ४३.३, तर छत्रपती संभाजीनगरला ४१.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात शनिवारी किमान तापमानही २२.३ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले आहे.

खान्देशात जल साठ्यात घट

जळगाव : खान्देशात सध्या उन्हाचा तडाखा वाढून तापमानाचा पारा ४१ ते ४३ अंशांच्या दरम्यान स्थिरावला आहे. उष्णतेमुळे जलप्रकल्पांमधील पातळीतही वेगाने घट होऊ लागली आहे. जळगाव जिल्ह्यातील लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या केवळ ४७.३६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक असून, पावसाळा सुरू होईपर्यंत पुढील तीन ते साडेतीन महिने पाण्याचे नियोजन करणे प्रशासनासाठी मोठी कसोटी ठरणार आहे.

मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली : देशात अनेक भागांत तापमानाचा पारा वाढत असताना भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) उष्णतेच्या लाटांबाबत सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचना प्रसृत केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. थेट सूर्यप्रकाशात, विशेषतः दुपारच्या वेळी जास्त वेळ राहणे टाळा, पुरेसे पाणी प्या, हलके आणि सैल कपडे घाला आणि अधिक तापमानाच्या काळात बाहेर मेहनतीच्या गोष्टी टाळा अशा सूचना करण्यात आल्या आहेत. प्रतिबंधात्मक उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे विभागाने स्पष्ट केले. भारतीय हवामान विभागाने मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्ती यांसारख्या संवेदनशील गटांसाठी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button