
पशुपालकांसाठी सुवर्णसंधी: किसान क्रेडिट कार्ड योजनेची विशेष मोहीम; जिल्ह्याला २४ हजार ५७६ चे उद्दिष्ट
रत्नागिरी): जिल्ह्यातील पशुपालकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पशुसंवर्धन व्यवसायाला चालना देण्यासाठी ‘किसान क्रेडिट कार्ड’ (KCC) योजनेची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. १ ते ३१ मे या कालावधीत ही मोहीम राबवली जाणार असून, यामुळे पशुपालकांना आता ०% व्याज दराने खेळते भांडवल उपलब्ध होणार आहे.
योजनेचे स्वरूप आणि लाभ
या योजनेच्या माध्यमातून दुग्धव्यवसाय, शेळीपालन, वराहपालन आणि कुक्कुटपालन करणाऱ्या वैयक्तिक पशुपालकांना, भूमिहीन शेतकऱ्यांना तसेच महिला स्वयंसहाय्यता गटांना खेळते भांडवल उपलब्ध करून दिले जाते.
विनातारण कर्ज: ज्यांच्याकडे शेतीचे क्रेडिट कार्ड नाही, त्यांना पशुपालनासाठी २ लाख रुपयांपर्यंत विनातारण कर्ज मिळू शकेल.
कर्ज मर्यादा: दूध संस्थेच्या हमीवर ही मर्यादा ३ लाख रुपयांपर्यंत वाढवता येते.
व्याज सवलत: कर्जाचा मूळ व्याजदर ७% आहे. मात्र, वेळेवर कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून ३% आणि राज्य सरकारकडून ४% अशी एकूण ७% व्याज सवलत मिळणार आहे. म्हणजेच नियमित कर्जफेड करणाऱ्यांना हे कर्ज शून्य टक्के व्याजदराने पडणार आहे.
जिल्ह्याचे उद्दिष्ट आणि विशेष मोहीम
रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकूण २४,५७६ लाभार्थ्यांचे लक्षांक निश्चित करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील सहकारी दुध सोसायट्या आणि पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज संकलित करण्यात येणार आहेत. पशुधनासाठी लागणारे खाद्य, पशुवैद्यकीय खर्च, मजुरी, वीज आणि चारा लागवड यांसारख्या दैनंदिन गरजांसाठी हे कर्ज वापरता येईल.
आवश्यक अटी व कागदपत्रे
योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटींची पूर्तता आणि कागदपत्रे आवश्यक आहेत:
कागदपत्रे: [आधारकार्ड], सातबारा व ८-अ उतारा, बँक पासबुक झेरॉक्स, पॅन कार्ड, रेशनकार्ड, फोटो आणि पशुधन असल्याचे प्रमाणपत्र.
अटी: पशुधनाची नोंदणी ‘एनडीएलएम’ (NDLM) पोर्टलवर असणे अनिवार्य आहे. तसेच लाभार्थ्याने यापूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
प्रशासनाचे आवाहन
पशुसंवर्धन व्यवसायाला संजीवनी देणाऱ्या या योजनेचा जास्तीत जास्त पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समिती रत्नागिरीचे सभापती प्रविण मेस्त्री (पांचाळ), उपसभापती गजानन धनावडे, गट विकास अधिकारी चेतन शेळके आणि पशुधन विकास अधिकारी डॉ. आदिती कसालकर यांनी केले आहे. इच्छुक पशुपालकांनी आपले प्रस्ताव संबंधित पशुवैद्यकीय चिकित्सालयामार्फत तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडे जमा करावेत.




