उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचाकुंभवडे-सागवे परिसरातील प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पास तीव्र विरोध जनआंदोलनाचा इशारा.


रत्नागिरी जिल्ह्यातील कुंभवडे, सागवे व नाणार परिसरात प्रस्तावित असलेल्या बॉक्साईट उत्खनन प्रकल्पामुळे स्थानिक जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष या प्रकल्पास ठाम आणि तीव्र विरोध नोंदवत असून, कोकणच्या पर्यावरण व जनजीवनाशी तडजोड होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेत आहे.

सुमारे १४४.९५ हेक्टर क्षेत्रावर व दरवर्षी ०.९ दशलक्ष टन क्षमतेच्या या उत्खनन प्रकल्पाचे दुष्परिणाम केवळ स्थानिक पातळीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण कोकणच्या पर्यावरणीय समतोलावर परिणाम करणारे आहेत.

प्रकल्पाविरोधातील आमची ठाम भूमिका:

बागायती व स्थानिक अर्थव्यवस्थेवर घाला:- आंबा व काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम होईल.

भूजल पातळी घट व जलसंकट:- उत्खननामुळे नैसर्गिक जलस्रोत बाधित होऊन पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

पर्यावरणीय ऱ्हास:- वनक्षेत्र, मृदा धूप, धूळ प्रदूषण आणि जैवविविधतेचे नुकसान यामुळे कोकणचा निसर्ग धोक्यात येईल.

आरोग्यावर गंभीर परिणाम:- उत्खननातून निर्माण होणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे आजार, त्वचारोग आणि दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो.

भूस्खलन व आपत्तीचा धोका:- कोकणातील डोंगराळ व मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणातील उत्खननामुळे भूस्खलन व नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वीकृतीचा अभाव:- ग्रामस्थांचा स्पष्ट विरोध असताना प्रकल्प पुढे रेटणे ही लोकशाही प्रक्रियेची पायमल्ली आहे.

कोकणच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने स्थानिक ग्रामस्थ व शिवसैनिकांच्या जोरावर प्रखर आणि सातत्यपूर्ण लढा उभारला होता. त्या एकजुटीच्या ताकदीमुळेच अखेर तो विनाशकारी प्रकल्प मागे घेण्यास शासनाला भाग पाडले गेले हा इतिहास कोकणकर विसरलेले नाहीत. त्याच धर्तीवर हा बॉक्साईट प्रकल्पही रोखण्याचा निर्धार आम्ही व्यक्त करतो.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष स्पष्ट इशारा देतो की, २० मे २०२६ रोजी प्रस्तावित जनसुनावणी तात्काळ रद्द करण्यात यावी. अन्यथा, स्थानिक ग्रामस्थ व शिवसैनिकांच्या सहभागातून ही जनसुनावणी उधळून लावण्यात येईल, याची गंभीर नोंद संबंधित प्रशासनाने घ्यावी.

“कोणत्याही परिस्थितीत कोकणच्या निसर्गाचा व जनतेच्या हक्कांचा बळी देणारा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही.”

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष कोकणच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्यास तयार असून, रत्नागिरी जिल्हाप्रमुख श्री. दत्ताजी कदम व उपजिल्हाप्रमुख श्री. रवींद्र डोळस व तालुका प्रमुख कमलाकर कदम यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी व शिवसैनिकांच्या सहभागातून या अन्यायकारक प्रकल्पाविरोधात वेळप्रसंगी व्यापक आणि तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा ठाम इशारा माध्यमातून देण्यात येत आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

जय महाराष्ट्र!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button