रत्नागिरीत आज अमृतपेठ थेट बाजारपेठेचे उद्घाटन; दर्जेदार स्थानिक उत्पादनांच्या खरेदीचा महोत्सव

लघुउद्योजकांना व्यासपीठ आणि ग्राहकांना थेट खरेदीची संधी; १२ एप्रिलला रात्री नऊपर्यंत राहणार सुरू

रत्नागिरी : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा राज्यभर यशस्वी ठरलेला अमृतपेठ थेट बाजारपेठ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आज (११ एप्रिल) रत्नागिरीत सुरू होत आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन धन्वंतरी हॉस्पिटलच्या डॉ. तोरल शिंदे यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ग्रामविकास आयामाचे कोकण प्रांत संयोजक मोहन भावे आणि प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सुहास ठाकूरदेसाई हे मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शहरातील साळवी स्टॉप परिसरात भरलेले हे प्रदर्शन आज आणि उद्या (११-१२ एप्रिल) दुपारी तीन ते रात्री नऊ या वेळेत सुरू राहणार असून, अधिक तपशील शेवटी दिला आहे.

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवते. त्यात उद्योजकतेला साह्य करण्यासाठी अमृतपेठ हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमामुळे शेतकरी, महिला बचत गट, लघुउद्योजक, तसेच अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील लाभार्थी, आणि स्वयंरोजगार करणाऱ्या लघुउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांची थेट विक्री करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होते. स्थानिक लघुउद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि ग्राहकांना थेट उत्पादकांकडून दर्जेदार स्थानिक उत्पादने खरेदीची संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.

या दोन दिवसांच्या बाजारपेठेत विविध प्रकारची ताजी कृषी उत्पादने, आंबे, कोकण प्रॉडक्ट्स, खात्रीचे मसाले, घरगुती खाद्यपदार्थ, आरोग्यदायी पदार्थ, आकर्षक हस्तकला वस्तू, ज्वेलरी, कपडे, लहान मुलांसाठी खाऊ, खेळणी, तसेच रत्नागिरीतील वैशिष्ट्यपूर्ण स्थानिक उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. या ठिकाणी भरणार असलेल्या खाद्यमहोत्सवात चटकदार पदार्थांचा आस्वादही घेता येईल. ग्राहकांना दर्जेदार व ताज्या वस्तू वाजवी दरात थेट उत्पादकांकडून घेण्याची संधी मिळणार असून, उत्पादकांना त्यांच्या मेहनतीचा आणि उदत्पादनांचा योग्य मोबदला मिळून त्यांचा उत्साह वाढणार आहे. काही उत्पादनांवर सवलतही दिली जाणार आहे.

अमृतपेठ थेट बाजारपेठ हा उपक्रम ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरत असून, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अमृतपेठ थेट बाजारपेठ

दिनांक : ११, १२ एप्रिल २०२६

वेळ : दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत

स्थळ : बाळासाहेब ठाकरे यूथ अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर हॉल,

डॉ. भोळे हॉस्पिटलच्या शेजारी, साळवी स्टॉप, रत्नागिरी.

लोकेशन लिंक : https://share.google/ql5Ym7AabEgrCarSc

अधिक माहितीसाठी संपर्क : 9112228761, 9422003128, 7021209405

……..

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button