
डेरवण येथे ४ ते २३ एप्रिल जिम्नॅस्टिक्सचे नि:शुल्क उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण
रत्नागिरी, दि. ) : विद्यार्थ्यांमध्ये जिम्नॅस्टिक खेळाची आवड निर्माण व्हावी, तसेच खेळाचे मूलभूत कौशल्य आत्मसात व्हावीत व आजच्या स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व निर्माण करण्याकरिता येणाऱ्या प्रत्येक संकटांना जिद्दीने लढा देता यावा या उद्देशाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तर्फे जिम्नॅस्टिक या खेळाचे नि:शुल्क क्रीडा प्रशिक्षण शिबिर एस व्ही जे सी टी क्रीडा संकुल, डेरवण येथे दि. ४ ते २३ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.
शिबिर कालावधी दरम्यान रोज सकाळी ७ ते ८ व सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिरासाठी ५ ते १६ वर्ष वयोगटातील मुले व मुली पात्र असतील.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र अंतर्गत जिल्ह्यामध्ये जिम्नॅस्टिक या खेळाचे निशुल्क क्रीडा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरामध्ये मुलांना फ्लोअर एक्सरसाईज, पोमेल हॉर्स, स्टील रिंग्स, टेबल वोल्ट, पॅरलल बार्स व होरीझोंटल बार तर मुलींना फ्लोअर एक्सरसाईज, टेबल वोल्ट, बॅलनसिंग बिम या उपकरणाची तसेच त्यावरील मूलभूत कौशल्याची ओळख या क्रीडा प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून होणार आहे.
जिम्नॅस्टिक्सचा मराठीत अर्थ ‘शारीरिक कसरती’ किंवा ‘व्यायामविद्या’ असा होतो. हा एक असा क्रीडा प्रकार आहे ज्यामध्ये शक्ती, चपळता, समन्वय आणि संतुलन सुधारण्यासाठी विविध क्रीडा उपकरणांचा वापर करून किंवा त्याशिवाय पद्धतशीर शारीरिक हालचाली आणि कसरत केली जाते. जिम्नॅस्टिक्स हा शरीराची ताकद, लवचिकता, समतोल, चपळता आणि सहनशक्ती वाढवणारा एक पद्धतशीर व्यायाम प्रकार आहे. जिम्नॅस्टिक्स हा खेळ हा सर्व खेळांचा पाया (जननी) मानला जातो, ज्यामुळे स्नायू बळकट होतात, मानसिक एकाग्रता वाढते आणि शरीर सुडौल राहते. नियमित जिम्नॅस्टिक्समुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होते. जिम्नॅस्टिकमधील हालचाली हात, पाय, खांदे, पाठ, छाती आणि पोटाच्या स्नायूंच्या गटांच्या विकासास हातभार लावतात. कलात्मक जिम्नॅस्टिक्स हा ऑलिम्पिक स्पर्धेतील नेहमीच सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या खेळांपैकी एक आहे.
जिम्नॅस्टिक्स उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत. प्रशिक्षण शिबिराच्या अधिक माहितीसाठी सचिन मांडवकर (८४०८८६५८७०) यांच्याशी संपर्क साधण्याचे व जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.



