
राष्ट्र सेविका समितीच्या ‘निवृत्त तरी कार्यरत’ समूहातर्फे दिव्यांग मुलांच्या मातांचा सन्मान
रत्नागिरी : येथील राष्ट्र सेविका समिती अंतर्गत असलेल्या “निवृत्त तरी कार्यरत” समूहाच्या वतीने ५ मार्च रोजी एक कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत दिव्यांग मुलांच्या मातांच्या जिद्दीला आणि कष्टाला सलाम करत त्यांना विशेष सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात शहरातील अभ्यंकर मूकबधिर शाळेतील विद्यार्थी गौरांग भोसले याची आई गौरी भोसले आणि आविष्कार मतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थी भूषण धुळप याची आई शर्मिला धुळप या दोघींचा सन्मान करण्यात आला. या दोन्ही मातांना समूहातर्फे आर्थिक मदत देण्यात आली. त्याचबरोबर या क्षेत्रातील अनुभवांवर आधारित लेख असलेली प्रेरणादायी पुस्तकेही त्यांना भेट म्हणून देण्यात आली. केवळ मातांचाच नव्हे, तर दोन्ही विद्यार्थ्यांचाही उत्साह वाढवण्यासाठी त्यांना खाऊ आणि चित्रकलेची कलर बुक्स देण्यात आली.
यावेळी समूहातील सदस्यांनी दोन्ही मातांशी संवाद साधून मुले किती वर्षांपासून शाळेत येत आहेत, त्यांच्या प्रगतीचा आलेख कसा आहे आणि घरातील वातावरण याविषयी सविस्तर जाणून घेतले. तसेच समूहाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती त्यांना देण्यात आली. दोन्ही शाळांमधील इतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यासाठी समूहातर्फे विशेष देणगी मूल्यही सुपूर्द करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी उमा दांडेकर यांनी, “जिये भूमीमाजी तुझा जन्म झाला, जिने पोसूनी पिंड हा वाढवीला, शिरी जाण बा ऋण हे थोर झाले, तुवा पाहिजे आजि ते फेडियेले,” हा अर्थपूर्ण श्लोक सादर करून समाजऋण फेडण्याचे महत्त्व विषद केले. ‘निवृत्त’ असूनही समाजासाठी ‘कार्यरत’ राहण्याच्या या भावनेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.




