
अटल सेतू परिसरात तिसरी तर वाढवणमध्ये चौथी मुंबई!
Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई आणि पालघरच्या वाढवण परिसरात चौथी मुंबई होणार असल्याची घोषणा केली. या शहरांच्या नियोजनबद्ध विकासामुळे विकासाला चालना मिळणार असल्याचा दावाही सरकारकडून करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी विकास योजनांची घोषणा करताना तिसऱया आणि चौथ्या मुंबईची मोठी घोषणा केली. यामध्ये तिसऱया मुंबईत कर्नाळा-साई-चिरनेर, रायगड पेण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्र ही ग्रीन-फिल्ड विकास पेंद्र म्हणून विकसित करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले तर पालघर जिह्यातील वाढवणजवळ चौथी मुंबई विकसित करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याअंतर्गत लॉजिस्टिक आणि वेअर हाऊसिंगसाठी विकास पेंद्रे निर्माण करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. वाढवण बंदरामुळे चौथी मुंबई प्रकल्पात लॉजिस्टिक आणि वेअर हाऊसिंगसाठी विकास पेंद्र निर्माण करणार, वाढवण बंदरामुळे 12 लाखांहून अधिक रोजगार, मासेमारांसाठी सातपाटी येथे अत्याधुनिक मत्स्यबंदर, आसपासच्या 44 गावांत कौशल्य विकासाचे उपक्रम राबविणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.
उन्नत मार्ग सप्टेंबरपर्यंत पूर्ण
- अटल सेतू ते सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू यादरम्यान सिग्नलविरहित वाहतुकीकरिता शिवडी-वरळी उन्नत मार्गाचे काम प्रगतिपथावर असून सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे तिसऱया मुंबई
प्रकल्पाला गती मिळणार असल्याचा दावाही सरकारकडून करण्यात आला आहे. - मुंबई-वाढवण सागरी सेतूने जोडणार
- मुंबई-वाढवण द्रुतगती जोडणी करण्यासाठी उत्तन ते विरार या सुमारे 58 हजार 754 कोटी रुपये किमतीच्या सागरी सेतूचे काम हाती घेण्यात येणार आहे.
- तसेच अटल सेतूला नवी मुंबई विमानतळाशी जोडण्यासाठी जुलै 2026 पर्यंत उलवे किनारी मार्गाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.
20 लाख झोपडपट्टीधारकांचा पुनर्विकास
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत मुंबई महानगर प्रदेशातील 20 लाख झोपडपट्टीधारकांच्या घरांच्या पुनर्विकासासाठी तसेच भाडेतत्त्वावरील घरांसह 10 लाख परवडणारी घरे विकसित करण्यासाठी बृहत् आराखडा तयार करण्यात येत आहे.
बेकायदेशीर बांधकामे रोखणार
मुंबई महानगर प्रदेशात नवीन बेकायदेशीर बांधकामे होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी जीआयएस आधारित मॅपिंगचा वापर करून ‘नो न्यू स्लम फ्रेमवर्क’ विकसित करण्यात येत आहे. सदर फ्रेमवर्क पुढे इतर शहरांतदेखील लागू करण्यात येईल.
भुयारी मार्ग
- एकात्मिक भुयारी मार्ग रस्ता प्रकल्पअंतर्गत वांद्रे-वरळी सागरी सेतू ते बुलेट ट्रेन स्थानक, वांद्रे-कुर्ला संकुल ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडण्यात येणार आहे. गायमुख जंक्शन ते फाऊंटन हॉटेल जंक्शनदरम्यान सुमारे 6 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग व फाऊंटन हॉटेल ते भाईंदरदरम्यान सुमारे 9 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग प्रस्तावित आहे.
- रस्त्यांवरील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मुंबई आणि पुणे शहरात भुयारी मार्गाचे जाळे उभारण्यात येणार आहे. मुंबई शहरातील ऑरेंज गेट, पूर्व मुक्त मार्ग ते मरीन ड्राईव्हदरम्यान भुयारी मार्ग प्रकल्पाच्या लॉचिंग शाफ्टचे बांधकाम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
- मुंबईतील पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱया गोरेगाव-मुलुंड या भुयारी मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम स्तरावर आहे. ठाणे ते बोरिवली या 18 हजार 838 कोटी रुपये किमतीच्या भुयारी मार्गाचे काम प्रगतिपथावर असून जून 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. खारघर ते तुर्भे या सुमारे 6 किलोमीटर लांबीच्या 2 हजार 100 कोटी रुपये किमतीच्या भुयारी मार्गाचे काम सप्टेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
मुंबई, पुणे, नागपुरात मेट्रो जाळे
मुंबई, पुणे व नागपूर शहरांमध्ये एकूण 490 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्यापैकी 173 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. तसेच आगामी वर्षात 50 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्याचे नियोजन आहे. सन 2029 पर्यंत आणखी 165 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका सुरू करण्यात येणार आहेत.
- वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया, मुंबई मेट्रो मार्गिका-11 हा 23 हजार 487 कोटी रुपये किमतीचा पूर्णतः भूमिगत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पातून पुढे वांद्रे उपनगरीय स्थानक व वांद्रे टर्मिनसपर्यंत करण्याचे नियोजन आहे.
- मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारा मुंबई मेट्रो मार्ग-8 हा 22 हजार 862 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.
- तळोजा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रो मार्ग-2 या 5 हजार 575 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पामुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल.
शिवडी-वरळी उन्नत मार्ग सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण
पूर्वेकडील अटल सेतू ते पश्चिमेकडील सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू यांच्यादरम्यान सिग्नलविरहीत वाहतुकीकरिता शिवडी-वरळी या उन्नत मार्गाचे काम प्रगतिपथावर असून सप्टेंबर 2026 पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
- स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू या 18 हजार 121 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाचे चारही टप्प्याचे काम प्रगतीत असून प्रकल्प मे 2028 अखेरपर्यंत पूर्ण करणार.
- वर्सोवा-दहिसर-भाईंदर हा 22 हजार 166 कोटी रुपये किमतीचा सुमारे 60 किलोमीटर लांबीचा किनारी मार्ग प्रगतीत असून डिसेंबर 2028 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
- मुंबई-वाढवण द्रुतगती जोडणी करण्याकरिता उत्तन ते विरार या सुमारे 58 हजार 754 कोटी रुपये किमतीच्या सागरी सेतूचे काम हाती घेण्यात आले आहे.
- दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाशी थेट जोडण्याकरिता छेडा नगर ते आनंद नगर व आनंद नगर ते साकेत, ठाणे या उन्नत मार्गाचे काम डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
प्रवासी जलवाहतूक
मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्यायी, पर्यावरणपूरक व स्वस्त उपाय म्हणून सध्याचे जलमार्गाचे 125 किलोमीटरचे जाळे 340 किलोमीटरपर्यंत विस्तारण्यात येणार आहे. यासाठी 21 विद्यमान जलमार्गावरील 20 टर्मिनल्सचे अद्ययावतीकरण तसेच 11 नवीन जलमार्गावर 24 टर्मिनल्सच्या निर्मितीसाठी 6 हजार 600 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबईमधील रेडिओ क्लब येथील नवीन जेट्टी प्रकल्प डिसेंबर, 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
विमानतळ विकास
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा डिसेंबर, 2025 पासून सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुरंदर, पुणेकरिता भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच गडचिरोली ग्रीनफिल्ड विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
लातूर, बारामती व अमरावती येथील विमानतळाच्या ठिकाणी रात्रीच्या उड्डाणांकरिता सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. शिर्डी, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, रत्नागिरी, यवतमाळ आणि कराड विमानतळांच्या विस्तारीकरणाची कामे सुरू करण्यात येत आहेत.




