आखाती देशातील युद्धाचा थेट फटका; दुबई बाजारपेठ बंद, जेएनपीएबाहेर १५०हून अधिक कांद्याचे कंटेनर अडकले!

नवी मुंबई : आखाती देशांतील युद्धस्थितीची दाहकता आता महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांपर्यंत पोहोचली आहे. मध्यपूर्वेतील तणावामुळे दुबई येथील प्रमुख आयात बाजारपेठ तात्पुरती बंद करण्यात आली असून भारतीय कांद्याची निर्यात थांबली आहे. परिणामी जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) येथे निर्यातीसाठी सज्ज असलेले १५०हून अधिक कंटेनर अडकून पडले आहेत. लाखो टन नाशवंत कांदा बंदर परिसरात अडकला असल्याने तो खराब होण्याची भीती निर्यातदार आणि शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

दुबई ही भारतीय कांद्याची प्रमुख निर्यात बाजारपेठ मानली जाते. विशेषतः नाशिक पट्ट्यातील कांदा मोठ्या प्रमाणावर आखाती देशांकडे पाठविला जातो. मात्र सध्या जहाजवाहतूक, विमा प्रक्रिया आणि आयात व्यवहारांवर परिणाम झाल्याने माल स्वीकारण्यास दुबईतील व्यापारी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. निर्यात प्रक्रियेत अनिश्चितता निर्माण झाल्याने व्यापारी आणि शेतकरी दोघांचेही आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे.

दरम्यान, देशांतर्गत बाजारात कांद्याच्या दरांवर तीव्र दबाव निर्माण झाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) येथील २ मार्च २०२६ रोजीच्या दरपत्रकानुसार कांद्याचे दर प्रतिकिलो २ ते १३ रुपयांदरम्यान नोंदवले गेले. उत्तम प्रतीच्या ‘गोळा’ कांद्याला १२ ते १३ रुपये किलो दर मिळाला, तर मध्यम प्रतीच्या पत्ती कांद्याला ८ ते ११ रुपये किलो भाव मिळाला. खालच्या प्रतीच्या ‘बिनापत्ती (सुका)’ कांद्याचा दर ४ ते ५ रुपये किलो आणि ‘बिनापत्ती (ओला)’ कांद्याचा दर २ ते ३ रुपये किलो इतका घसरला आहे.

हे दर पाहता उत्पादन खर्च, मजुरी, वाहतूक आणि पॅकिंग खर्च वजा करता शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नसल्याची परिस्थिती आहे. निर्यात बंद झाल्यामुळे स्थानिक बाजारात आवक वाढली असून पुरवठा जास्त आणि मागणी मर्यादित अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दर आणखी घसरण्याची भीती व्यापारी व्यक्त करीत आहेत.

यात भर म्हणजे होळी आणि धुळवडीच्या सणानिमित्त मंगळवारी, ३ मार्च रोजी बाजार समिती बंद राहणार असल्याने व्यवहारात खंड पडणार आहे. सलग सुट्यांमुळे साठा वाढण्याची शक्यता आहे. त्यात भरास भर म्हणून ५० किलो वजन मर्यादेच्या मुद्द्यावरून माथाडी कामगारांनी एपीएमसीच्या कांदा-बटाटा बाजारात कामबंद आंदोलन पुकारल्याने बाजार आवारात येणारा कांदा देखील वेळीच उतरवला न गेल्याने खरेदी-विक्री व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यापारी वर्तवत आहेत. आधीच बंदरात अडकलेले कंटेनर, वाढते साठवणुकीचे शुल्क, माल खराब होण्याचा धोका आणि माथाडी कामगारांचे कामबंद आंदोलन या चारही बाजूंनी आलेल्या संकटात कांदा उत्पादक सापडले आहेत.

आखाती युद्धाचा परिणाम केवळ सीमांपुरता मर्यादित न राहता तो थेट शेतकऱ्यांच्या शिवारात पोहोचल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. दुबई बाजारपेठ पुन्हा सुरू होईपर्यंत अनिश्चिततेचे सावट कायम राहणार असून केंद्र व राज्य सरकारने तातडीने पर्यायी निर्यात बाजारपेठा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच दर स्थिर ठेवण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button