
� सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी-दोडामार्गातील २५ गावांना ‘इको सेन्सिटिव्ह झोन’चा दर्जा; खाणकामावर आता कायमची बंदी!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील २५ गावांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या गावांना ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ (पर्यावरण संवेदनशील क्षेत्र) म्हणून घोषित करणारी अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या निर्णयामुळे या परिसरात प्रस्तावित असलेल्या खाणकामांना आणि पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या मोठ्या प्रकल्पांना आता अधिकृतपणे चाप बसणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया राबवण्यात आली असून मंगळवारी केंद्र सरकारने यावर शिक्कामोर्तब केले. गेल्या २०१० पासून ‘वनशक्ती’ या संस्थेच्या माध्यमातून स्टॅलिन दयानंद यांनी हा न्यायालयीन लढा सुरू ठेवला होता. या अधिसूचनेमुळे आता या गावांमध्ये खाणकाम, लाल श्रेणीतील प्रदूषणकारी उद्योग आणि वनसंपदेला धोका निर्माण करणाऱ्या प्रकल्पांवर पूर्णपणे बंदी असेल.
या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतील तर उपवनसंरक्षक हे सचिव म्हणून काम पाहतील. वर्षभराच्या आत ही समिती स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या गावांचा झाला समावेश
केसरी, फणसवडे, उडेली, दाभील-नेवली, सरमळे, ओटवणे, घारपी, असनिये, फुकेरी, तांबोळी, कोनशी, भालावल, भेकुर्ली, कुंभवडे, खडपडे, तळकट, झोळबे, कोलझर, शिरवल, कुंब्रल, पणतूर्ली, उगाडे, भिकेकोनाळ, कळणे आणि पडवे माजगाव या गावांचा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समावेश आहे.




