
तीस दिवसांच्या लढ्याकडे प्रशासनाची पाठ का? –
लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधातील संघर्ष होणार तीव्र, आंदोलनाला वाढता पाठिंबा
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीविरोधातील कोकण नागरी संघर्ष समितीमार्फत सुरु असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. गेल्या ३० दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आंब्रे हे कंपनीच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करत ठिय्या मांडून बसले आहेत. कडाक्याच्या थंडीत, भर उन्हात हे आंदोलन सुरू ठेवत त्यांनी “मानवता हाच धर्म” हा संदेश देत सर्व समाजघटकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. या लढ्याला महिना ओलांडला तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने आंदोलक, पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
“लोकशाहीत जनतेचा आवाज ऐकला गेला पाहिजे; मात्र प्रशासनाने जाणीवपूर्वक पाठ फिरवली आहे,” असा संतप्त सूर आंदोलनस्थळी उमटत आहे. कडाक्याच्या थंडीतही सुरू असलेल्या या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याने कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या आंदोलनात सुबोध सावंतदेसाई, उदय घाग, ॲड. संकेत साळवी, बशिर मुजावर तसेच कोकण नागरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते, महिला, युवा वर्ग आणि स्थानिक लोकही मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
कंपनीकडून पीएफएएस (PFAS) सारख्या रसायनांचे उत्पादन होत असल्याची भीती व्यक्त करत स्थानिक नागरिक व पर्यावरणवादी संघटनांनी याला तीव्र विरोध दर्शविला आहे. ही रसायने पाणी, माती आणि पर्यावरणावर दीर्घकालीन दुष्परिणाम करू शकतात, असा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. कोकणच्या निसर्गसंपदेवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, या पार्श्वभूमीवर आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे.
युवकांचा निर्धार; शिवजयंतीला क्रांतिकारक संदेश
१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त आंदोलनस्थळी विशेष कार्यक्रम घेण्यात आला. असंख्य युवक-युवती, महिला व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहून शिवरायांच्या अन्यायाविरोधातील लढ्याची प्रेरणा घेत कंपनीविरोधात लढा तीव्र करण्याची शपथ घेतली.
“कोकणच्या माथ्यावर मांडलेला हा विषारी प्रकल्प कायमस्वरूपी बंद व्हावा,” असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. युवकांचा वाढता सहभाग आंदोलनाला नवी ऊर्जा देत असल्याचे आंदोलकांचे मत आहे.
विविध संघटनांचा पाठिंबा
कोकण पर्यावरण संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला दाभोळखाडी परिसर संघर्ष समिती, अ. दा. भोई समाज तसेच अन्य स्थानिक संघटनांचा पाठिंबा लाभला आहे. दाभोळखाडी परिसर संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय भि. जुवळे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आंदोलनस्थळी उपस्थित राहून समर्थन जाहीर केले.
दररोज विविध क्षेत्रातील मान्यवर, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिक आंदोलनस्थळी भेट देत असून, प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी आंदोलकांकडून होत आहे.
“जनआंदोलनात सामील व्हा”
“हा लढा कोणत्याही पक्षाचा नसून जनतेच्या अस्तित्वाचा आहे. सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला तर कोणतेही सरकार हा प्रश्न दुर्लक्षित करू शकणार नाही,” असे आवाहन अशोक जाधव यांनी केले.
लोटे एमआयडीसीतील हे आंदोलन आता व्यापक जनचळवळीत रूपांतरित होत असून, येत्या काळात ते आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. कोकणच्या पर्यावरणरक्षणासाठी सुरू झालेला हा संघर्ष प्रशासन कोणत्या भूमिकेतून हाताळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




