तरुणीचा पाठलाग करणाऱ्या भामट्यावर गुन्हा दाखल

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ कारवाई

रत्नागिरी : बारावी बोर्डाची परीक्षा देऊन घरी जाणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करणाऱ्या भामट्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तरुणीने या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहत या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.


याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजून १० वाजण्याच्या सुमारास एक महाविद्यालयीन तरुणी बारावी बोर्डची परीक्षा देऊन रत्नागिरी बस स्थानक येथून घरी जाण्यासाठी निघाली. बसने प्रवास करत असताना एका इसम जिल्हा शासकीय रुग्णालय बस स्टॉप येथे या तरुणीचा पाठलाग करण्याच्या उद्देशाने बसमध्ये चढला. या मुलीच्या शेजारी बसत तिच्या संमतीशिवाय मोबाईलद्वारे चोरून छायाचित्रे काढू लागला. याची कल्पना आल्यानंतर तरुणीने या घटनेची माहिती मोबाईलवरून पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन फिर्यादी तरुणीची भेट घेतली व संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली.
श्री. बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीस तात्काळ ताब्यात घेतले आणि या घटनेबाबत संबंधित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७८(१) व ७९ अन्वये तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button