
भाजप-ठाकरेसेना युतीचे पडसाद राज्यात उमटणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा इशारा; म्हणाले, आम्ही परभणीमध्ये…
बुलढाणा : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तानाट्याचा अखेर मंगळवारी नाट्यमय अन अनपेक्षित अंत झाला. शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोबत घेत भाजपने राजकीय चमत्कार घडवत चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन केली आहे. अवघ्या एका मताच्या फरकाने भाजपच्या संगीता खांडेकर यांनी महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत ईश्वर चिठ्ठीद्वारे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रशांत दानव विजयी झाले आहेत.
ठाकरे सेने पाठोपाठ नवीन मित्र पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीने आणि एमआयएम यांनी भाजपला सोयीस्कर अशी भूमिका घेतली. यामुळे आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. यावर आपल्या स्वगृही बुलढाण्यात प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी सोबत बोलतांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ चांगलेच संतापल्यायाचे आज मंगळवारी ( दि. १०) दिसून आले. सपकाळ यांनी उबाठा चे उद्धव बाळासाहेब ठाकरे व वंचित आघाडीला चांगलेच फैलावर घेतले.
त्यांनी ठाकरेंना थेट निर्वाणीचा इशारा देत चंद्रपूर मधील राजकारणाचे पडसाद राज्यात उमटतील अश्या शब्दात ठाकरेंना खडे बोल सुनावले. याचा अर्थ आम्ही परभणी आमच्या सोयीनुसार वागावे असा होतॊ का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
चंद्रपूर मध्ये घोडेबाजारच
या अनौपचारिक चर्चेत हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा नेते सुधीर मुनगन्टी वार यांच्यावरही टिकास्त्र सोडले. ते म्हणाले की, चंद्रपुरात नक्कीच मोठा घोडेबाजार झाला आहे. सुधीर मुनगंटीवार यांचा १ हजार कोटीचा बंगला हा चर्चेचा विषय आहे. महापौर पद प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी तेवढेच पत्ते विकत घेतले आहेत. यात मोठा घोडेबाजार झालेला आहे.
मित्र पक्ष वंचित बहुजन आघाडीच्या भूमिके बद्धल नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले की वंचित ने आमच्यासोबत असायला हवे होते हे तेवढेच खरं आहे. चंद्रपूरच्या काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांना आम्ही एकत्रित येण्यासाठी पुढाकार घेतला. आमच्या पक्षात कुठेही फाटाफूट झाली नाही. यात उबाठाने सरळसरळ भाजपला पाठिंबा दिला. सुधीर मुनगंटीवार यांनी जसा बंगला बांधला, तशाच पद्धतीने आज त्यांनी महापौर बसवला आहे, असा आरोप त्यांनी केला.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, नेमकं काय झालं याबाबत काँग्रेस पक्ष निरीक्षकाकडून मी अहवाल मागवला आहे. आमच्या पक्षात कुठेही गटबाजी नाही. वास्तविकता ठाकरेंची शिवसेना ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा भाग आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देणे अभिप्रेत होतं.
मात्र, तसं झालं नाही. याचे परिणाम निश्चितपणे महाराष्ट्रभर उमटल्याशिवाय राहणार नाही, याचा पुनरूच्चर त्यांनी केला. वंचित आणि ठाकरे गटाचे मतदान आम्हाला मिळू शकलं नाही, याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. ठाकरे गट आमच्यासोबत चंद्रपूरला आला नाही तर परभणीत आम्ही आमच्या सोयीने वागायचं का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. महाविकास आघाडी सध्या संक्रमण परिस्थितीतून जात असल्याचे देखील हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.




