
महावितरणचा शेतकर्यांना दुहेरी धक्का, ग्रामीण भागात बिलात मोठी वाढ
महावितरण कंपनीने राज्यातील लाखो शेतकर्यांना नवीन वर्षात मोठा आर्थिक झटका दिला आहे. विधिमंडळातील तीव्र विरोधानंतर काही काळ स्थगित केलेले वीज ग्राहकांचे कृषी आणि कृषी-इतर असे वर्गीकरण जानेवारी महिन्याच्या बिलांपासून पुन्हा एकदा लागू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शेतात राहणारी कुटुंबे, मोठे आणि छोटे प्रक्रिया उद्योग असणार्या शेतकर्यांच्या वीज बिलात मोठी वाढ झाली असून ग्रामीण भागात संतापाची लाट उसळली आहे.
ज्या शेतकर्यांच्या शेतात राहती घरे किंवा अन्य जोडण्या आहेत, त्यांना पूर्वी कृषी पंपाच्या सवलतीच्या दराने वीज मिळत होती. मात्र महावितरणने आता तांत्रिक बदल करून या जोडण्यांना कृषी-इतर म्हणजेच निवासी किंवा व्यावसायिक श्रेणीत टाकले आहे. पावसाळी अधिवेशनात अनेक लोकप्रतिनिधींनी यावर कडाडून आक्षेप घेतल्यावर सरकारने हे वर्गीकरण थांबवून एकत्रित बिले देण्याचे आदेश दिले होते. मात्र आता जानेवारीच्या बिलांमध्ये पुन्हा स्वतंत्र मीटरिंग आणि बिलिंग सुरू झाल्याने सरकारचा हा शब्द हवेतच विरल्याचे दिसून येत आहे.
www.konkantoday.com



