
विवाहाचा मुहूर्त गाठण्यापूर्वी रेश्माने आपल्या नागरिक कर्तव्याला प्राधान्य देत मतदानाचा मुहूर्त साधला
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत खेड तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाचा उत्साह दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील जामगे गावात लोकशाहीप्रती कर्तव्यभावना जपणारा एक प्रेरणादायी प्रसंग घडला.जामगे येथील नरळकर कुटुंबातील वधू रेश्मा हिचा आज दापोली तालुक्यातील माटवण येथील विवेक याच्यासोबत विवाह सोहळा पार पडणार आहे. मात्र, विवाहाचा मुहूर्त गाठण्यापूर्वी रेश्माने आपल्या नागरिक कर्तव्याला प्राधान्य देत मतदानाचा मुहूर्त साधला.रेश्मा हिने वऱ्हाडासह थेट जामगे जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्र गाठले. तेथे रेश्माने आपला मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीप्रती असलेली निष्ठा व्यक्त केली. नववधूच्या या कृतीकडे पाहण्यासाठी मतदार, मतदान कर्मचारी तसेच गावकरीही थांबले होते. अनेकांनी तिच्या या निर्णयाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.




