
रत्नागिरी नगर परिषदेतर्फे अतिक्रमण करणार्यांवर कारवाई होणार
रत्नागिरी शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी नगर परिषदेने आता कडक पावले उचलली आहेत. शहरातील अतिक्रमणांना कोणतीही सवलत न देण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या के.सी. जैन नगरातील रस्त्यांवरील गाळ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगर परिषदेने आता कंबर कसली आहे. नूतन नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे आणि नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत या अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
शुक्रवारपासून कोकणनगर भागात प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होणार आहे. शहरातील रस्ते, गटारे आणि फूटपाथवर थाटलेली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याचे आवाहन नगर परिषदेने नोटिशीद्वारे केले होते. मात्र, काहींनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने आता प्रशासनाने बळाचा वापर करण्याच ठरवले आहे. शुक्रवारपासून पोलीस बंदोबस्तात कोकणनगरातील रस्त्याकडचे अनधिकृत गाळे हटवण्यास सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विमानतळ प्राधिकरण संयुक्तपणे ही मोहीम राबवणार असल्याची माहिती नगर अभियंता यतिराज जाधव यांनी दिली आहे.
विकास योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्यावर गेल्या चार वर्षांपासून सहा पत्र्याचे गाळे अडथळा ठरत आहेत. या गाळ्यांविरोधात जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडेही तक्रारींचा ओघ सुरू होता. प्रशासक राजवटीत याकडे दुर्लक्ष झाले असले, तरी आता नूतन नगरसेवकांनी या विषयाला प्राधान्य दिले आहे.www.konkantoday.com




