
खेडच्या आकाशात झेपावणार तेजस, मिराज, राफेल व सुखोई, एरो मॉडेलिंग शोचे आयोजन
लायन्स क्लब ऑफ खेड व शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था, खेड यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त शुक्रवार दि. २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत पाटीदार भवन शेजारील मैदान, भरणे नाका येथे एक भव्य व आगळावेगळा एरो मॉडेलिंग शो आयोजित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद भिकूशेठ तोडकरी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या एरो मॉडेलिंग शोमध्ये भारतीय वायूसेनेची प्रतीक ठरलेली मिराज २०००, तेजस, राफेल व सुखोई-३० ही चार आरसी. फायटर विमाने प्रत्यक्ष मैदानातून आकाशात झेपावणार आहेत. अवघ्या ५० ते २०० फूट उंचीवर होणार्या या थरारक कसरती प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवणार्या असतील. व्हर्टीकल टेक-ऑफ, व्हर्टिकल चार्ली, स्ट्रेट रोल, रायफल रोल, ईन्व्हर्टेड फ्लायिंग, स्पिन तसेच नागाप्रमाणे फणा काढणारी कोब्रा मुव्हमेंट अशा अनेक रोमहर्षक प्रात्यक्षिकांचा अनुभव प्रेक्षकांना प्रत्यक्ष डोळ्यासमोर घेता येणार आहे.
याशिवाय हवेत दिमाखात उडणारा ईगल, नाचणारा मासा, उडती तबकडी तसेच बॅनर व रंगीबेरंगी पताकांचा हवेत वर्षाव करणारे सेस्ना विमान अशी विविध नाविन्यपूर्ण विमानांची आकर्षक प्रात्यक्षिके देखील या शोचे वैशिष्ट्य ठरणार आहे.www.konkantoday.com




