
मुंबई-गोवा महामार्गासाठी जनआक्रोश समितीचे संगमेश्वर येथील सोनवी पुलाजवळ जोरदार आंदोलन
कोकणातून जाणारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम १८ वर्ष रखडलेले आहे. या महामार्गावर अपघातांचे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. याचा उद्रेक झाल्याने महामार्ग रोखून कोकणकरांनी संताप व्यक्त केला आहे. या अन्यायाविरोधात जन आक्रोश समितीच्या वतीने संगमेश्वर येथील सोनवी पुलाजवळ जोरदार रस्ता रोको करून आंदोलन करण्यात आले.
मुंबई गोवा महामार्ग हा कोकण वासियांचा जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. या महामार्गाचे काम गेली १८ वर्ष रखडले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम केवळ विकासाचा प्रश्न राहिलेला नसून तो आता कोकणवासीयांच्या संयमाची, जिविताची आणि जगण्याच्या हक्काची परीक्षा बनला आहे.
अर्धवट अवस्थेत असलेल्या महामार्गामुळे रोज अपघात, मृत्यू, आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास सहन करणाऱ्या जनतेचा संताप या आंदोलनाने उफाळून आला. शासनाने रखडलेले या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे ठोस आणि लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. यावेळी उदासीन शासनाची आंदोलकांनी प्रतिकात्मक तिरडी यात्रा काढली. हा महामार्ग म्हणजे कोकणाचा मृत्यूमार्ग बनत चालल्याचा गंभीर संदेश यातून देण्यात आला. सलग एक तास महामार्ग पूर्णपणे ठप्प राहिल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या.
महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने प्रवासी, रुग्णवाहिका, मालवाहतूक वाहनांचे हाल झाले. मात्र आंदोलकांनी यासाठी प्रशासनालाच जबाबदार धरले. येथील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच उपविभागीय अधिकारी नीलेश माईंनकर आणि पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण घटनास्थळी दाखल होऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या महामार्गाचे काम त्वरित सुरू न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल, असा निर्धार जन आक्रोश समितीने व्यक्त केला आहे.




