
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुका राष्ट्रवादी स्वबळावर लढणार
आमदार शेखर निकम यांची घोषणा
चिपळूण : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) यांची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी बाग हायस्कूल येथे आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या मागील निवडणुकीत आपल्यावर अन्याय व फसवणूक झाल्याच्या भावना तीव्र शब्दांत मांडल्या. महायुती नको, स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, अशी स्पष्ट भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. या वेळी आमदार शेखर निकम हेही आक्रमक दिसून आले आणि त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची ठाम घोषणा केली.
या बैठकीला आमदार शेखर निकम यांच्यासह जयंद्रथ खताते, शौकत मुकादम, नितीन ठसाळे, विजय गुजर, पूजा निकम, दिलीप माटे, सुरेश खापले, दिशा दाभोळकर, दादा साळवी, दशरथ दाभोळकर, बाबू साळवी यांच्यासह तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिपळूण नगर पालिका निवडणुकीत भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप आमदार शेखर निकम यांनी केला. “त्या निवडणुकीत आम्हाला गाफील ठेवण्यात आले. आयत्यावेळी महायुतीत घेतले गेले नाही. त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत गाफील राहायचे नाही, आयत्यावेळी उमेदवार शोधायचे नाहीत. वाटेल ते परिणाम झाले तरी चालतील, पण यावेळी निवडणूक स्वबळावरच लढायची.”
देवरुख नगरपंचायत निवडणुकीचा उल्लेख करताना आमदार निकम म्हणाले, “तेथे माझा उमेदवार असतानाही मी भाजपला नगराध्यक्षपद दिले होते. माझ्या निवडणुकीत भाजप माझ्यासोबत होते, याची जाणीव ठेवून मी तो निर्णय घेतला. मात्र चिपळूण नगरपालिकेच्या वेळी आम्हाला डावलण्यात आले. त्यामुळे आता कोणत्याही प्रकारची जोखीम घेतली जाणार नाही.”
“ग्रामीण भागात शिवसेना व भाजपची ताकद नाही, ती राष्ट्रवादीची आहे. यावेळी आपली ताकद दाखवून देऊ. राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) म्हणून चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पूर्णपणे स्वबळावर लढवण्यात येतील,” अशी ठाम भूमिका आमदार शेखर निकम यांनी मांडली. या घोषणेमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून आगामी निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




