
पतंजलीच्या तुपानंतर आता लाल तिखटही खराब; मिरची पावडरमध्ये सापडली घातक कीटकनाशके; केंद्राची लोकसभेत माहिती!
योगगुरू रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली फूड्स’च्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. उत्तराखंडमधील पतंजलीच्या युनिटमध्ये तयार करण्यात आलेल्या लाल मिरची पावडरचा नमुना चाचणीत असुरक्षित आढळल्याची माहिती केंद्र सरकारने शुक्रवारी लोकसभेत दिली. या मिरची पावडरमध्ये कीटकनाशकांचे प्रमाण दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, २०२४-२५ या वर्षात मसाल्यांच्या गुणवत्तेसाठी राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान पतंजलीच्या उत्तराखंडमधील उत्पादन युनिटमधून लाल मिरची पावडरचे नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यांच्या तपासणीत कीटकनाशकांचे अवशेष निर्धारित मॅक्सिमम रेसिड्यू लिमिटपेक्षा जास्त आढळले आहेत.
या धक्कादायक निष्कर्षानंतर संबंधित प्राधिकरणाने तातडीने रिकॉल आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, पतंजली फूड्सने बाधित उत्पादने बाजारातून परत घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, अमुल ब्रँडच्या कोणत्याही उत्पादनात अशा प्रकारची त्रुटी आढळली नसल्याचेही मंत्र्यांनी स्पष्ट
पतंजलीची उत्पादने वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही महिन्यांतही अशा घटना घडल्या आहेत. याच महिन्याच्या सुरुवातीला पतंजलीचे तूप क्वालिटी टेस्टमध्ये फेल झाले होते, ज्याबद्दल उत्तराखंडमधील न्यायालयाने कंपनीला १.४० लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. मे २०२४ मध्ये सोन पापडीच्या निकृष्ट गुणवत्तेमुळे पतंजलीच्या एका असिस्टंट मॅनेजरसह तिघांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायद्याचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे उत्तराखंड सरकारने पतंजलीच्या १४ उत्पादनांचे परवाने निलंबित केले होते. यामध्ये मधुग्रिट, लिपिडोम आणि स्वसारी सारख्या प्रसिद्ध औषधांचा समावेश होता.
खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र आणि राज्य सरकारे मिळून एफएसएसएआयच्या माध्यमातून वर्षभर तपासणी मोहिमा राबवतात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाते, असे प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट केले.




