
रत्नागिरीच्या विजेता मोर्ये, सुवर्णा राघव महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
रत्नागिरी : ए. डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा “महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार २०२५” हा राज्यस्तरीय सन्मान यावर्षी लांजा येथील विजेता विजय मोर्ये आणि राजापूर येथील सुवर्णा गणपत राघव यांना त्यांच्या सामाजिक योगदानाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात आला.
विजेता मोर्ये यांना सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक उपक्रम, कला क्षेत्रातील योगदान, तसेच वंचित घटकांसाठी केलेल्या सामाजिक हस्तक्षेपाची राज्यस्तरावर दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
तर सुवर्णा गणपत राघव या ओणी (राजापूर) येथील वात्सल्य मंदिरच्या अधीक्षिका आहेत. गेल्या २२ वर्षांपासून अनाथ, एक पालक, वंचित व विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या पुनर्वसन, संरक्षण आणि शिक्षणासाठी केलेल्या निःस्वार्थ व निरपेक्ष सेवेसाठी त्यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या सातत्यपूर्ण सेवेमुळे असंख्य बालकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडला आहे.
पुणे येथे झालेल्या या सोहळ्याला आयकर विभाग आयुक्त (पुणे) डॉ. नितीन वाघमोडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाचे (महाराष्ट्र राज्य) सरचिटणीस प्रा. शिवाजी खांडेकर, सुप्रसिद्ध व्याख्यात्या ॲड. प्रियदर्शनी कोकरे, मिसेस इंडिया २०१८ व मिसेस वर्ल्ड २०२१ डॉ. सारिका शहा, ज्येष्ठ विधीज्ञ (मुंबई उच्च न्यायालय) डॉ. ॲड. अंजना खताळ आदी मान्यवर उपस्थित होते. विविध सामाजिक, प्रशासकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या.
हा पुरस्कार माझ्या सामाजिक आणि कलाक्षेत्रातील कार्याला नव्याने प्रेरणा देणारा असल्याची भावना विजेता मोर्ये यांनी व्यक्त केली.
या राज्यस्तरीय सन्मानामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अभिमानाची भावना व्यक्त करण्यात येत असून या दोघींवरही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




